- प्रज्ञा म्हात्रे /जान्हवी मोर्येठाणे/डोंबिवली : कोरोना गो... कोरोना गो... या घोषणांनी साऱ्यांची करमणूक केली. मात्र, कोरोनामुळे मम्मीपप्पा वर्क फ्रॉम होम करीत असल्याने घराघरांतील लहानमोठी मुले जाम खूश आहेत. छोट्या मनीषला आईला सापशिडीत हरवण्याची संधी लाभली आहे, तर गौरीताई आणि बाबा सध्या दररोज नवनवीन रेसिपी बनवून पाहत आहेत. अभ्यास घ्यायला आई किंवा बाबा घरात आहेत, ही कल्पनाही मुलांना सुखावून गेली आहे. कोरोना गो... कोरोना गो... पण मम्मीपप्पा आॅफिस नो गो, अशी भावना बच्चेकंपनी बोलून दाखवत आहे.ठाणे, डोंबिवली, कल्याण किंवा त्यापुढे राहणाºया बहुतांश नोकरदार कुटुंबांतील मुलांना आईबाबा भेटत नाहीत. सुटीच्या दिवशी घरातील साठलेली कामे यात ते व्यस्त असतात. कोरोनाने बच्चेकंपनीला त्यांचे पालक ‘भेटले’ आहेत.खाजगी कंपनीत काम करणा-या डोंबिवलीतील वृषाली पटवर्धन-माने यांना घरी बसून काम करण्याचे आदेश असल्याने त्या कार्यालयीन वेळेप्रमाणे १० ते ७ या वेळेत काम करतात. त्या अकाउंटंट असल्याने मेल पाठविणे, वरिष्ठांशी संपर्क साधणे, ही कामे त्यांना करावी लागतात. कार्यालयीन वेळेइतकेच काम करावे लागत असले, तरी प्रवासाचा वेळ वाचल्याने तो वेळ मुलीला देता येत आहे. मुलगी नववीत असल्याने व १५ एप्रिलनंतर तिची परीक्षा असल्याने मुलीचा अभ्यास घेण्यासाठी त्यांना थोडा अधिकचा वेळ मिळाला आहे. आॅफिसचे काम करतकरत मुलीचा अभ्यास घेत असल्याने तिची किती तयारी झाली आहे, हे समजते. त्यांची कन्या तन्वी हिने सांगितले की, एरव्ही आईला माझ्यासाठी फारसा वेळ नसतो. शाळा आणि क्लास नसल्याने तीच माझा अभ्यास घेत आहे. आई घरात असल्याने थोडा ओरडा पडतो. सतत अभ्यास कर म्हणून मागे लागते. अभ्यासानंतर अवांतर वाचन करतो.सविता निकम या खाजगी शाळेत ग्रंथपाल आहेत. त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू असल्याने मुलीला परीक्षा केंद्रावर नेणे आणि आणणे सोयीचे झाले आहे. मुलीचा अभ्यासही घेता येत आहे. मुलगा आठवीला असल्याने त्याची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे त्याला अभ्यास नाही, पण त्याला शुद्धलेखन, इंग्रजीतील शब्द लिहिण्यास भाग पाडणे, असे सुरू आहे. मुलगी दहावीला असल्याने घरात टीव्ही बंद आहे. थोडासा विरंगुळा म्हणून बुद्धिबळ खेळतो, असे त्या म्हणाल्या. तेजस निकम म्हणाला, आई नसली की, सर्व कामे आमची आम्हालाच करावी लागतात. आता आईकडून लाड करून घेत आहे. परीक्षा नसल्याने अभ्यासाचेही टेन्शन संपले आहे. त्यांची कन्या विश्रुती हिला दहावीचा पेपर पुढे ढकलल्याने दडपण आले आहे. मात्र, अभ्यासासाठी वेळ आणि आईचा सहवास मिळाल्याचा आनंद आहे, असे सांगितले.आईबाबांना एकत्र घरात पाहिल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. आईबाबांसोबत वेळ घालविण्याची, गोष्टी ऐकण्याची, सापशिडी खेळण्याची आणि हो खूप गप्पा मारण्याचीही संधी मिळाली आहे.सक्तीच्या सुटीमुळे एकत्र वेळ घालवता येत आहे. कित्येक दिवसांनी सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बरेच खेळ खेळत आहोत. वडिलांनाही वर्कफ्रॉम होम असल्याने सगळे घरी एकत्र जेवत आहोत. बहिणीची दहावीची परीक्षा असल्याने तिचा अभ्यास बाबांनी घेतला. ही सक्तीची सुटी एका अर्थाने बºयाच गोष्टींचा आनंद देणारी आहे. - दिव्येश बापट, ठाणेबाबांनी घरी आल्यावर जेव्हा पुढील १० दिवस मी घरातून काम करणार, ही बातमी दिली, त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला कळायला लागल्यापासून आजपर्यंत ते माझ्यासोबत इतक्या दिवस कधीच नव्हते. त्यांना सुटी मिळायची पण एवढी मोठी तर कधीच नाही. आता आम्ही दोघांनी जेवणात नवनवीन डीश बनवण्याचे ठरवले आहे. खूप गप्पा मारणार, गाणी ऐकणार, आणि धमाल विनोदी सिनेमाही पाहणार. - गौरी राजे, ठाणेमोठी सुटी मिळाल्याने आईने घराची साफसफाई करायला घेतली आणि अडगळीत पडलेले जुने फोटो सापडले. जेवताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आमच्या गप्पा रंगल्या. बºयाच वर्षांनंतर आम्ही सारे एकमेकांना एवढा वेळ दिला. ते दोघेही घरातून काम करीत असल्याने आॅफिसमध्ये ते किती व्यस्त असतात, हेही जाणवले. - रिचा जोशी, ठाणे
Coronavirus : वर्क फ्रॉम होममुळे त्यांना ‘भेटले’ हरवलेले आईबाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 4:05 AM