मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्येक जण आपापल्या पातळीवर या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुढे येत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १९८२ पर्यंत पोहचली आहे तर १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ४६ रुग्ण आढळून आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवलीतील रुग्णांची वाढता संख्या पाहता महापालिकेने डोंबिवली शहरात एखादं खासगी रुग्णालय ताब्यात घ्यावं अशी सूचना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली होती. यासाठी आमदार राजू पाटील यांनी स्वत:चं आर.आर हॉस्पिटलही कोरोनाग्रस्त रुग्णालयांसाठी देण्याची तयारी केली होती. त्याला महापालिका आयुक्तांनीही मान्यता दिल्याने आता डोंबिवली कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची सोय होणार आहे.
आर.आर हॉस्पिटलमध्ये १५ ते २० व्हेंटिलेटर असलेले १०० बेडचे सर्व सुविधायुक्त रुग्णालय मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. कोरोना रुग्णांसाठी शहरात एखादे खासगी हॉस्पिटल पूर्णत: कोविड १९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी असणार आहे. डोंबिवली हद्दीतील पहिले खासगी रुग्णालय तयार असून रुग्णांवर उपचार हॉस्पिटल मधील आणि आयएमएचे डॉक्टर करतील अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान महापालिका हद्दीत सगळ्य़ात आधी कल्याण पूव्रेतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. तो अमेरिकेहून कल्याणला 6 मार्च रोजी परतला होता. त्याच्या तीन वर्षाच्या मुलीसह त्याच्या पत्नीला ही लागण झाली होती. तीन वर्षाच्या मुलीने सगळ्य़ात आधी कोरोनावर मात केली होती. तिलाही घरी पाठविण्यात आले होते. त्या पाठोपाठ कल्याण पश्चिमेतील सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे.
डोंबिवली शहराच्या हद्दीला लागून असलेल्या कोपर, भोपर, संदप, उसरघर या परिसपासून जवळच दिवा आहे. या दिव्यात काल एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्याठिकाणी पाहणी करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी धाव घेऊन ठाणो महापालिकेने व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दिव्यातील कोरोना संशयीताची चाचणी करावी. तसेच निजर्तूकीकरण, धूर फवारणी करण्याची मागणी केली आहे.