मुंबई - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीन लाखांहून वर पोहचला आहे. राज्यातही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच या संघर्षाच्या काळात कोलमडलेल्या आरोग्य सेवेवरुन सत्ताधारी पक्षांवर विरोधकांनी गंभीर आरोप लावले आहेत.
मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. राजू पाटील म्हणतात की, केडीएमसीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युतीचीच सत्ता आहे. जवळजवळ २० हजार कोटींच्यावर बजेट या काळात मंजुर झाले. परंतु आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मागच्या सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार वैद्यकिय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हेच आरोग्यमंत्री पण होते आणि खासदार तर डॉक्टरच आहेत. तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच राहिली असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच खरंतर एखादे वैद्यकिय महाविद्यालय व दोन्ही शहरात एक एक सुसज्ज दवाखाना सहज उभारता आले असते. त्यामुळे भाजपाने पण आता जबाबदारी झटकण्याचे काम करू नये. या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात दोन्ही पक्षांचा वाटा समान आहे. एकीकडे सत्ताधारी आरोग्यसेवा तयार करू शकले नाहीत म्हणून सध्या करोडो रुपये खर्च करून खाटा टाकायची कामं करत आहे. तर दुसरीकडे गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनला विरोध करून नंतर होणाऱ्या प्राणहानी वरून राजकारण करण्याचे जर कोणी मनात आणत असेल तर ते माणूसकीला धरून होणार नाही असं सांगत राजू पाटील यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, कोरोना काळात नुसतेच राजकीय आरोपप्रत्यारोप करायचे नाही हे आधीच ठरवले होते. परंतु आज महापालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या १२/१३ दिवसापासून रोज साधारण ७ ते ८ मिनिटात एक रूग्ण या वेगाने वाढत आहेत. केडीएमसीकडे उपलब्ध बेड व रूग्णांची संख्या समान झाली आहे. अशावेळी प्रशासन याआधी घेतलेल्या लॉकडाऊन काळात पुरेशा सोई उपलब्ध करण्यात सपशेल कमी पडल्याचे दिसत आहे. म्हणून प्रशासनाने पुरेशा सोई उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसाचा ‘लॉकडाऊन नव्हे कर्फ्यू’ घोषित करणे गरजेचे आहे. नाहीतर यापुढे रुग्णांना बेड न मिळाल्याने रस्त्यावर आपला प्राण सोडवे लागतील.म्हणून अशावेळी एक कडक लॉकडाऊन घेणे गरजेचे आहे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.