- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाच्या संकटाच्या काळात वॉर्डबॉयची मागणी वाढल्याने ८० जागा भरण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतल्यानंतर १८ हजार रुपये वेतनाच्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकरीकरिता एमए, एमएससी, बीकॉम तसेच डेअरी डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ५०० हून अधिक तरुण-तरुणींनी अर्ज केला आहे. यावरून देशातील बेरोजगारीची तीव्रता तर प्रकट होतेच, पण पोटाची भूक कोरोनाच्या भयावर मात करीत असल्याचेही जाणवते.कोरोनावर मात करण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. आरोग्याच्या संकटाचा मुकाबला करताना देश आर्थिक संकटात लोटला गेला. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या हाताला असलेले काम गेले. अन्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधीची कवाडे बंद झाली असताना केवळ आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. जीव जगविण्यासाठी जीव धोक्यात घालणारी कोविडकाळातील नोकरीची संधी पाहताच त्यावर राज्यभरातील बेरोजगारांनी उड्या घेतल्या. कल्याण-डोंबिवलीतील महापालिकेच्या इस्पितळांमध्ये दहावी पासची शैक्षणिक पात्रता असलेल्या वॉर्डबॉयच्या ८० जागांकरिता राज्यभरातून १,१८९ जणांनी लॉकडाऊन असतानाही कल्याण गाठले. या बेरोजगार तरुणांपैकी ५०० पेक्षा जास्त तरुण हे उच्चशिक्षित आहेत. बेरोजगारीमुळे कमी शैक्षणिक पात्रतेचे काम करण्यास हे उच्चशिक्षित तयार झाले आहेत.केडीएमसीकडे १०० खाटांची दोन मोठी रुग्णालये आहेत. त्यापैकी एक कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि दुसरे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय. याशिवाय १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या सगळ्या आरोग्य व्यवस्थेला डॉक्टर, नर्सची ९० पदे मंजूर असताना ही पदे भरली गेली नाही. त्याची प्रक्रिया २०१४ पासून सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आहे. सरकारच्या नियमाप्रमाणे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे तेथे ५२ खाटांची व्यवस्था करता आली. रुक्मिणीबाई रुग्णालय अन्य रुग्णांसाठी ते खुले ठेवणे गरजेचे होते. कोरोनाचे संकट पाहता कोविडकाळासाठी डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ यांची भरती प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. त्यासोबत वॉर्डबॉयची भरती ठेवली.वॉर्डबॉयच्या तात्पुरत्या पदाकरिता दहावी पास ही शैक्षणिक पात्रता निश्चित केली होती. वॉर्डबॉयला १८ हजार पगार दिला जाणार आहे. आॅनलाइन जाहिरात झळकताच राज्यातील कानाकोपऱ्यांतून बेरोजगार तरुण-तरुणींनी कल्याणमध्ये धाव घेतली. जळगाव, उस्मानाबाद, नागपूर, नाशिक, रत्नागिरीतून मुलाखतीसाठी १,१७९ उमेदवार आले होते. त्यापैकी १,११३ जण पात्र ठरले आहे. पात्र उमेदवारांपैकी ५०० पेक्षा जास्त तरुण-तरुणी या एमएससी, एमए, बीकॉम आहेत. काहींनी डेअरी व्यवस्थापनाचा कोर्स केला आहे. तर, काहींनी बँकेच्या परीक्षा यापूर्वी दिलेल्या आहेत.आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिका डोंबिवली बंदिस्त क्रीडासंकुलात, डोंबिवली जिमखाना, कल्याण फडके मैदान आर्ट गॅलरीत, साई निर्वाण, बीएसयूपी योजनेतील घरांत क्वारंटाइन सेंटर व कोविड रुग्णालये सुरू करीत आहे. येत्या २० जुलैपर्यंत जवळपास एक हजार बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आणखीन २०० वॉर्डबॉयची गरज भासणार आहे. त्यामुळे २८० वॉर्डबॉय निवडले जाऊ शकतात. साहजिकच, पात्र असूनही जवळपास ८३३ उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरले जाणार आहे.कोरोनाकाळात आरोग्य सेवेत कार्यरत राहण्यामुळे प्रसंगी मृत्यूशी गाठ पडू शकते, याकडे उमेदवारांचे लक्ष वेधले असता मृत्यूचे भय घेऊन बसलो, तर पोट कसे भरणार, असा प्रतिसाद बहुतांश उमेदवारांनीदिला.मी उच्चशिक्षित असूनही वॉर्डबॉयची नोकरी करण्याकरिता अर्ज केला. कारण, मला तातडीने रोजगाराची गरज आहे. ही नोकरी मला प्राप्त होईल, अशी मला आशा आहे.- गणेश आंधळे, अहमदनगर
coronavirus: एमएससी, एमए, बीकॉम झालेले होणार वॉर्डबॉय, तात्पुरत्या नोकरीकरिता उच्चशिक्षितांच्या पडल्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 2:11 AM