मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच ठाण्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात असणाऱ्या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं.
जितेंद्र आव्हाडांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे मात्र यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं उघडं झालं आहे. थोड्याच वेळात रुग्णवाहिकेतून या नेत्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. ठाण्यात मागील २४ तासात तब्बल २८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची पुष्टी झाल्याने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४ च्या वर गेली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडील बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलं होतं. या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन म्हणजेच 'होम क्वॉरंटाईन'चा तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता.
कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर शासन आणि प्रशासनातील लोक रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर राहून काम करत आहेत. यामध्ये आघाडीवर राहून काम करणारा मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याचे समोर आलं. आतापर्यंत राज्यातील १९ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान कोरोनाची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण घराबाहेर पडू नका असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.