मीरा रोड : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यावर गावाला गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. परंतु परराज्यातून परतलेल्यांची नोंदणी केली जात नसून कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांची नोंद होत नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये परतणाऱ्यांची होती. परंतु परराज्यातील मूळगावी महाराष्ट्राच्या तुलनेत हाताला काम व उत्पन्न नसल्याने कामगार व कुटुंब पुन्हा परतू लागले आहेत. मीरा- भार्इंदरमधील लहान- मोठे उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले असून अन्य लहान व्यवसाय सुरु होत आहेत. मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारने कामगारांची रेल्वे व बसने मोफत प्रवासाची सोय केली होती. शिवाय असंख्य जण पायी वा टेम्पोमधून जात होते. पण आता अनेकजण पुन्हा मिळेल त्या मार्गाने रोजगारासाठी शहरात येत असताना त्यांची कोणतीच नोंदणी केली जात नाही. अशा लोकांना अलगीकरणात ठेवले जात नाही. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जात नाही असे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले. परराज्यातून पोटापाण्यासाठी येणाºया लोकांची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. गृहमंत्र्यांनीही बाहेरून येणाºया कामगारांची नोंदणी केली जाईल म्हटले होते. परंतु पोलीस व पालिका नोंदणी करत नसल्याने पुन्हा बजबजपुरी माजेल. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे.