बोईसर : बोईसर शहरात मागील दोन आठवड्यात २४ जणांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बोईसरमध्ये आतापर्यंत एकूण ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोईसर व शेजारच्या खैरापाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील गाव, पाडे व रहिवासी क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.बोईसरमधील यादवनगरमध्ये शनिवारी एक तर रविवारी भांडारवाडाजवळील भवानी चौक तीन, शुक्ला कंपाऊंड (भैय्यापाडा ) येथे एक आणि बोईसर पूर्व मधील दांडीपाडा भागात एक असे एकूण सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोना संक्रमणातील वाढ धोक्याच्या मार्गाने जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. दरम्यान, आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांमधील काही रुग्ण बरेही झाले आहेत, तर उर्वरित रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण बोईसरला असून आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व ही साखळी ब्रेक करण्याकरिता आता युद्ध पातळीवर कठोर उपाययोजना म्हणून बोईसर ग्रामपंचायतीने सर्व सीमा बंद केल्या आहेत.बीएआरसीमधील कर्मचारी, त्याचे कुटुंब कोरोनाबाधिततारापूर बीएआरसीमधील ३२ वर्षीय कर्मचारी, त्याची २९ वर्षीय पत्नी, पाच वर्षीय मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब राहत असलेली बीएआरसी कॉलनीतील बिल्डिंग रविवारी आरोग्य विभाग व पोलिसांनी सील केली आहे. चौघांपैकी एकाची चाचणी पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या कर्मचाºयाच्या मुंबई येथे राहणाºया आई-वडिलांनाही १० जूनला कोरोना झाल्याचे समजते.
CoronaVirus News: बोईसरमध्ये दोन आठवड्यांत २४ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:49 PM