मीरारोड - केंद्र शासनाकडून कोरोनाच्या मागणीनुसार लस दिल्या जात नसल्याचा आरोप होत असतानाच मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा केवळ ३३४० इतक्याच शिल्लक असल्याने महापालिकेने ६ लसीकरण केंद्र बंद केली आहेत. तर उर्वरीत ५ लसीकरण केंद्रावर सुद्धा केवळ लसीचा दुसरा डोस घ्यायचे बाकी असणाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. रोज केवळ ५०० लोकांनाच लस मिळणार आहे. लोकांनी लसीकरण केंद्रावर नोंदणी शिवाय गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेला शासनाकडून कोविशील्डच्या ९४ हजार तर कोवॅक्सीनच्या १२ हजार ६२० अशा एकूण १ लाख ६ हजार ६२० लसींचा साठा पुरवण्यात आला होता. शहरात लसीकरणासाठी पालिकेची ११ केंद्र तर खासगी ९ केंद्र सुरू करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे या अनुषंगाने रोज ३ ते साडे तीन हजार लसीकरणाचे टार्गेट असताना सुमारे ५ हजार पर्यंत रोज लसीकरण केले गेले केले. लसीकरण केंद्रावर वैद्यकीय कमर्चाऱ्यांसह शिक्षक, आशा वर्कर यांची सुद्धा मदत घेण्यात आली. महापालिकेने लसीकरणाचे नियोजन करत जास्तीजास्त सुविधा देत त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला.
बुधवार ७ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार पहिला डोस दिलेल्यांची संख्या ८६ हजार ९२७ तर दुसरा डोस दिलेल्यांची संख्या ८ हजार ८९ इतकी होती. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ४३ हजार २२८ लस देण्यात आल्या. तर ४५ ते ६० वयोगटातील ३१ हजार ५११ जणांना लस देण्यात आली. वैद्यकीय व आपत्कालीन सेवेतील लोकांना १३ हजार ३३१ आणि ६ हजार ९४६ इतक्या लस देण्यात आल्या आहेत. परंतु लसीची सतत मागणी करून देखील पुवठा न झाल्याने गुरुवार ८ एप्रिलच्या सायंकाळी केवळ ३३४० कोविशील्डच्या लस शिल्लक राहिल्या आहेत . लसीचा साठा जवळपास संपल्याने महापालिकेला आता लसीकरणाची मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन येथील आरोग्य केंद्रातील लसीकरण तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्रातच लसीकरण चालणार आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा नव्याने लसीकरण केले जाणार नाही. केवळ दुसरा डोस ज्यांचा बाकी आहे त्यांचेच लसीकरण केले जाणार आहे. लसीची उपलब्धता पाहता रोज प्रत्येक लसीकरण केंद्रात केवळ १०० लोकांनाच लस दिली जाणार असून एकूण ५०० लस रोज दिल्या जातील. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाणार आहे.
डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - सध्या शासनाकडून लसीचा पुरवठा झालेला नसल्याने ६ केंद्र तात्पुरती बंद केली आहेत. ज्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे तेथे रोज प्रत्येकी १०० जणांनाच तेही दुसरा डोस बाकी असणाऱ्यांना लस दिली जाईल. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व ऑनलाईन नोंदणी करावी. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. नागरिकांना कोरोना संसर्गाचा पासून मुक्त करण्यासाठी पालिकेने दिलेल्या इष्टांक पेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले आहे. लसीकरण केंद्रात आवश्यक सर्व सुविधा व कर्मचारी तैनात आहेत.