लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणा-या एक हजार ६१७ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी देखिल कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून सात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर २६२ वाहने शुक्रवारी सायंकाळपर्यंत जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर अशा चार विभागातील १८ युनिटच्या पथकांनी ही कारवाई केली. अत्यावश्यक तसेच वैद्यकीय कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणा-या तसेच जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर ३ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. यामध्ये सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात ६८० वाहन चालकांकडून तीन लाख १९ हजार ७०० रुपयांचा दंड ई चलनाद्वारे वसूल करण्यात आला. तर भिवंडीमध्ये ५४० वाहने दोन लाख २७ हजार १०० रुपयांचा दंड, कल्याण डोंबिवलीमध्ये १८७ वाहने- ९२ हजार ५०० रुपयांचा दंड, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या क्षेत्रात ११९ वाहने- ५३ हजार ७०० रुपयांचा दंड तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील ९१ चालकांकडून ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, ३ जुलै रोजी संपूर्ण दिवसभरात वाहतूकीचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळणा-या २६२ चालकांची वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये १७७ मोटारसायकली, ६८ रिक्षा आणि १७ मोटारकारचा समावेश आहे. नारपोलीमध्ये सर्वाधिक ३५, वागळे इस्टेटमध्ये २४ तर कोळशेवाडीमध्ये १८ दुचाकी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या एक हजार ६१७ वाहन चालकांवर कारवाई: २६२ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:08 PM
वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊनही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सर्रास विनाकारण घराबाहेर पडणा-या एक हजार ६१७ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी देखिल कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून सात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड ई चलनाद्वारे वसूल केला आहे.
ठळक मुद्देठाणे शहर वाहतूक नियंत्रण शखेची कारवाईसात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल