लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिकेने शहरात लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब केल्यामुळे ठाणे शहर पोलिसांनीही विनाकारण फिरणाºयांवर यापुढे कारवाईचा इशारा दिला आहे. अत्यावश्यक सेवा, दूध, भाजीपाला, किराणा,रुग्णालय आणि मेडिकल वगळता इतर कोणीही विनाकारण फिरल्यास त्यांच्यावर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात ३२८ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) असून वागळे इस्टेट परिसरात या झोनची संख्या मोठी आहे. परंतू, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, लोकमान्यनगर, माजीवडा- मानपाडा, नौपाडा- कोपरी, वागळे इस्टेट आणि दिवा अशा सर्वच प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. यासाठी ठाणे शहरात २०० तर वागळे इस्टेट परिमंडळात २२५ पोलिसांची जादा कुमक राहणार आहे. याशिवाय, राज्य राखीव दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाच्या १०० जवानांसह प्रत्येक पोलीस ठाण्यातील ६० टक्के पोलिसांचे संख्याबळही या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.
‘‘ ठाण्यात संचारबंदी (कर्फ्यू) लागू नाही. पण अत्यावश्यक आणि वैद्यकीय कामांव्यतिरिक्त कोणीही विनाकारण फिरतांना आढळणा-यांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचावाबरोबरच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर