नितीन पंडित भिवंडी : भिवंडीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात एकूण १४७१ हून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून यात ग्रामीण भागातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमधील रुग्णांना शासकीय रुग्णालयांत उपचार मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारांसाठी ४० ते ५० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनमध्ये काम बंद असताना उपचारावर हजारोंचा खर्च करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच ज्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिवारातील नागरिकांनाही बाधा झाली तर त्या प्रत्येक व्यक्तीचे खासगी रुग्णालयाचे भरमसाट बिल कसे भरावे, असा प्रश्न सतावत आहे.भिवंडीत स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय घोषित झाले आहे. सध्या मनपाच्या कार्यकक्षेत हे रुग्णालय आहे. १०० बेडची रुग्ण व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात मनपाच्या भोंगळ कारभारामुळे सेवा सुविधांचा बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयात नागरिकांना योग्य व आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे आरोप होत आहेत.भिवंडीत आतापर्यंत ७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य मृत रुग्णांना या रुग्णालयाच्या गैरसोयीमुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्यातच कोविड रुग्णालय हे मनपाच्या अखत्यारीत असल्याने सध्या शहरातील रुग्णांनाच या रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. तसेच, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी या रुग्णालयात कोणतीच सोय नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या भागातील रुग्णांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.>उसनवारी, दागिने गहाणठेवून उपचारांचा खर्चभिवंडीतील ग्रामीण कोरोनाबाधित रुग्णांसाठी भिनार येथे ४०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यापैकी २०० बेड उपलब्ध झाले आहेत. मात्र, या सेंटरसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकार, नर्स व कर्मचारी उपलब्ध झाले नसल्याने हे कोविड सेंटर अजूनही सुरू झालेले नाही. सावद येथेही कोविड सेंटर मंजूर झाले असल्याची माहिती मिळत आहे. पण तेही सुरू झाली नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्ण उसनवारी व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन, तर काही जण दागिने गहाण ठेवून रुग्णालयाचा बिल भरत असल्याची माहिती मिळत आहे. >जेवणात डासभिवंडी : रांजनोलीनाका येथील टाटा आमंत्रणमधील क्वारंटाइन सेंटरमधील रु ग्णांना देण्यात येणारा नाश्ता आणि भोजनात डास आणि किडे सापडत असल्याच्या तक्र ारीरु ग्णांनी केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रु ग्णांना नाश्त्यात दिलेल्या समोशामध्ये डास आढळल्याने संबंधित कॅन्टीन व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दल अध्यक्ष अशोक जैन यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
CoronaVirus News : भिवंडी ग्रामीणमध्ये रुग्णांची परवड, भरमसाट बिलांमुळे नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:35 AM