- अजित मांडकेठाणे : राज्यात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत असताना आता ठाणे शहरातही त्यांना कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. खेळण्यासही बाहेर सोडू नका, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सुमारे ९८३ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या एक महिन्यात लहान मुलांची संख्या वाढताना दिसून आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांबरोबर लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून आता दिवसाला दीड हजारच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. महापालिका हद्दीत सध्या ८३ हजार ८२६ कोरोनाबाधित असून त्यातील ७० हजार ६१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, एक हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या महापालिका हद्दीत रोजच्या रोज पंधराशे ते सतराशे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही आता मागील महिनाभरापासून ठाण्यात ज्येष्ठांसह आता लहान मुलांनादेखील कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना कोरोनापासून रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शाळा बंद असल्या तरी घरात राहणारी मुले खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानात जात आहेत, त्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांना घरीच ठेवण्याचे आवाहन आता करण्यात येत आहे. पालकांनी स्वत:बरोबर मुलांची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.ठाण्यात १ मार्च ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत ० ते ५ वयोगटांतील २१०, ६ ते १० वयोगटांतील ३४४ आणि ११ ते १५ या वयोगटांतील ४२९ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, एकूण ९८३ मुलांपैकी ४७४ मुलांवर उपचार सुरू आहेत. तर, ५०९ मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११ ते १५ वयोगटांतील ४२९ मुलांना कोरोनाची लक्षणे आढळली. या वयोगटांतील मुले सध्या सुटी असल्याने बाहेर पडत आहेत. यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे सध्या बागबगिचे, उद्याने बंद आहेत. पण, असे असताना अनेक लहान मुले उद्यान आणि बगिचात खेळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी आता मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.एकत्र खेळण्यामुळे झाला परिणामआधी लॉकडाऊन असल्याने मुले जास्त प्रमाणात बाहेर पडत नव्हती. परंतु, आता खेळायला बाहेर पडून उद्यानातदेखील जात हाेती. याशिवाय, कोरोनाच्या दुस:या लाटेत घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली, तर घरातील इतर मंडळीदेखील बाधित होत असून यात मुलेही बाधित होत आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा अधिक वाढताना दिसत आहे. - डॉ. संतोष कदम, बालरोगतज्ज्ञ व अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन , ठाणे
CoronaVirus News: सावधान, आता लहान मुलेही आली कोरोनाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:57 AM