कोरोनामुळे लक्षावधी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मात्र, खासगी रुग्णालये, चाचण्या करणाऱ्या लॅब, औषध कंपन्या व वितरक, औषध दुकानदारांची अक्षरश: चांदी झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॅबमधून कोरोना पॉझिटिव्हचे रिपोर्ट लवकर मिळत नाहीत. रुग्णाची प्रकृती खराब असली, तरी खासगी रुग्णालये लक्षावधी रुपयांचे डिपॉझिट जमा केल्याखेरीज रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. रुग्णाचे रिपोर्ट येण्यापूर्वीच बहुतांश रुग्णांना टोकलिझुमॅब व रेमडेसिवीर ही इंजेक्शने देण्याकरिता ती तातडीने घेऊन येण्याचा आग्रह रुग्णालये धरतात. सध्या या दोन्ही इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने त्यांचा देमार काळाबाजार सुरू आहे.
बाजारात या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई औषध कंपन्या, वितरक व औषध दुकानदार यांनी निर्माण करून ३१ हजार ६०० रुपयांचे टोकलिझुमॅब वेगवेगळ्या किमतीस चढ्या दरात विकण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे. हे इंजेक्शन मीरा-भार्इंदरमध्ये ७० हजार रुपयांना विकले जात आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन पाच हजार ५०० रुपयांना असताना बाजारात उपलब्ध नसल्याची आवई उठवून ३५ ते ४५ हजार रुपयांना विकले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या कसायांवर केंद्र अथवा राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. या दारुण व संतापजनक परिस्थितीचा आढावा घेतला आहे, ‘लोकमत’चे प्रतिनिधी मुरलीधर भवार, जितेंद्र कालेकर, सदानंद नाईक, धीरज परब आणि नितीन पंडित यांनी...कल्याण टोकलिझुमॅब@ 45,000
कल्याण : कोरोनावर कोणतेही थेट प्रभावी औषध नाही. कोरोना टाळण्याकरिता प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे होमिओपॅथी, आयुर्वेद यामध्येगोळ्या, काढा या स्वरूपात आहेत. कोरोना झालेल्या व प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांकरिता केंद्रीय आरोग्य खात्याने टोकलिझुमॅब आणि रेमडेसिवीर ही दोन इंजेक्शने दिली आहेत. कोरोना विषाणू फुफ्फुसात जाऊन त्याचा संसर्ग जीवघेणा होणे यामुळे टळते. मात्र, ही इंजेक्शने बाजारात उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांना मुंबईत धाव घ्यावी लागते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सध्या या दोन्ही इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. वाट्टेल ती किंमत मोजून ही इंजेक्शन खरेदी करण्याकरिता रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण करावी लागत आहे.कल्याण-डोंबिवलीतील औषधांच्या दुकानांत या इंजेक्शनची विचारणा केली असता दुकानदारांनी ही इंजेक्शन त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, तसेच ती या ठिकाणी कुठल्याच दुकानात मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यासाठी मुंबईला जावे लागेल. त्याठिकाणीही मिळेल की नाही, याची हमी देता येत नाही, असेही सांगितले. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने ते कोणी घेईल की नाही, या शंकेमुळे दुकानदार ठेवत नसावेत. इंजेक्शनची मागणी अचानक वाढल्याने बाजारात तुटवड्याची स्थिती उद्भवली असावी.यासंदर्भात डॉ. राजकरण सिंग यांनी सांगितले की, या इंजेक्शनला केंद्राच्या आरोग्य खात्याने मान्यता दिली आहे. हे इंजेक्शन अॅण्टीव्हायरस आहे. त्यामुळे ते कोरोनावर प्रभावी ठरते. रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी करणारे इंजेक्शन आहे. त्याची मागणी वाढल्यामुळे ते उपलब्ध होत नाही. महापालिकेचे आरोग्य खाते, डॉक्टर, औषध दुकानदार मागणी वाढल्याने इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती देत असले, तरी अशीही चर्चा आहे की, दुकानदारांकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, ते हेतुत: काळाबाजार करण्याकरिता इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगतात.अमेरिकेने ही इंजेक्शन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे सांगण्यात येते. भारतात ते न मिळण्याचे हेही एक कारण आहे. मात्र, रुग्णांच्या नातलगांच्या मते या इंजेक्शनचा दुकानदार काळाबाजार करीत आहेत. कल्याणच्या काळाचौकी परिसरात राहणाºया एका गृहस्थास श्वसनाचा त्रास झाला. त्यांनी सिटी स्कॅन केले असता त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी महापालिकेने अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. त्याठिकाणी कसाबसा त्यांना बेड उपलब्ध झाला. त्यांची कोरोना टेस्ट झालेली नसताना त्यांना इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले गेले.शहरात लॉकडाऊन असतानाही त्यांच्या नातेवाइकांनी मुंबईत घाटकोपर येथे टॅक्सी करून धाव घेतली. त्याठिकाणी मुख्य वितरकाकडे टोकलिझुमॅब इंजेक्शन ३१ हजार ६०० रुपये किमतीला होते. मात्र, रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट असल्याशिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही, असे औषध विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक अधिकच बुचकळ्यात पडले.भांडुप येथील मेडिकल शॉपमध्ये तेच इंजेक्शन ३३ हजार ६०० रुपयांना उपलब्ध होते. मात्र, तेथेही ते रिपोर्टखेरीज दिले जात नव्हते. अखेरीस, कल्याणमध्येच एका मेडिकल दुकानात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टशिवाय ४५ हजारांना ते रुग्णाच्या नातलगांना उपलब्ध झाले. रेमडेसिवीर हे इंजेक्शन मागील आठवड्यात मिळत नव्हते. पाच हजार ५०० रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन थोड्याथोडक्या नव्हे तर ३५ हजार रुपयांना काळ्याबाजारात विकले जात होते. अशा अनंत अडचणींचा सामना रुग्णांच्या नातलगांना इंजेक्शन मिळविताना करावा लागत आहे.
ठाणे टोकलिझुमॅब @ 40,000ठाणे : कोविडवरील टोकलिझुमॅब व रेमडेसिवीर ही इंजेक्शन मिळण्याकरिता तब्बल चार तासांची पायपीट केल्यानंतरही ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. एका कोविडग्रस्त रुग्णासाठी दिलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे ‘टोकलिझुमॅब’ इंजेक्शन मिळविण्यासाठी ठाण्यातील अनेक मेडिकल दुकानांमध्ये प्रयत्न केला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनीजवळील वेलनेस या नामांकित औषधांच्या दुकानात खरेदीसाठी विचारणा केली. तिथे अर्ध्या तासाने क्र मांक लागल्यानंतर हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथे रेमडेसिवीर, डेक्सॉमिथेसॉन आणि फेविपिराव्हिर या औषधांचीही विचारणा केल्यावर तीही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. कधी आणि किती रुपयांमध्ये उपलब्ध होतील, याबाबतही संबंधित विक्रेत्याला काहीच सांगता आले नाही. हरिनिवास सर्कल येथील फिनिक्स या दुकानात विचारणा केली. तिथेही हे इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नव्यानेच बाजारात उपलब्ध झालेल्या फेविपिराव्हिर या विषाणूरोधक प्रतिजैविकाची किंमत तीन हजार रुपये असून ते मागणीनुसार दुसºया दिवशी उपलब्ध करून देऊ शकतो, असे या विक्रेत्याने सांगितले. मात्र, ‘टोकलिझुमॅब’ या इंजेक्शनसह कोविडवरील इतर कोणतेही इंजेक्शन नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, जवळच असलेल्या ‘नॅचरल’ या औषधांच्या दुकानात विचारणा केली, तेव्हा तिथेही यातील कोणतीच औषधे उपलब्ध नव्हती. नौपाड्यातील जेनरिको आणि वेलनेस फॉरएव्हर या बड्या दुकानामध्येही उपलब्धता नव्हती. कोविड रुग्णालयाजवळील औषधाच्या दुकानात ती मिळू शकतील, असा सल्ला या विक्रेत्यांनी दिला. ठाणे हेल्थ केअर या कोविड रुग्णालयातील औषधांच्या दुकानात टोकलिझुमॅबचे प्रिस्क्रिप्शन प्रस्तुत प्रतिनिधीने दाखवले. तिथेही औषधे उपलब्ध नसल्याचेच उत्तर मिळाले.ठाण्यातही तुटवडाकौशल्या या कोविड रुग्णालयातील औषधांच्या दुकानात विचारणा केल्यावर ‘टोकलिझुमॅब’ या इंजेक्शनचा बाजारात तुटवडा असून ते ४० हजार ५४५ रुपयांना उपलब्ध होते, असे सांगण्यात आले. या दुकानातून घाटकोपरच्या एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रतिनिधीचा फोन नंबर देण्यात आला. मात्र, वारंवार संपर्क साधूनही या क्र मांकावर कोणीही उपलब्ध झाले नाही.उल्हासनगर टोकलिझुमॅब @ 19,000उल्हासनगर : कोरोना महामारीच्या काळात उपचाराकरिता वापरण्यात येत असलेले टोकलिझुमॅब-४०० हे इंजेक्शन वेगवेगळ्या किमतीत मेडिकल स्टोअर्समध्ये मिळत आहे. मात्र, ओळख असल्याशिवाय इंजेक्शन देण्याचा धोका मेडिकलचालक स्वीकारत नाही. उल्हासनगरसह सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णाला त्वरित आराम मिळण्यासाठी खाजगी व सरकारी रुग्णालये नातेवाइकांना टोकलिझुमॅब-४०० हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगतात.मात्र, मेडिकलचालकांकडे हे इंजेक्शन मागितल्यावर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मात्र, आपणास इंजेक्शन हवे असल्यास काही वेळात मागवून देतो, असे सांगितले जाते. या इंजेक्शनची किंमत एका मेडिकलचालकाने 16,000 तर दुसऱ्या मेडिकल स्टोअर्सने १९ हजार असल्याचे सांगितले. मुंबईतील मुख्य वितरकाकडे 31,600 रुपयांना मिळणारे इंजेक्शन १६ किंवा १९ हजार रुपयांना कसे विकले जात आहे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे टोकलिझुमॅब या इंजेक्शनच्या नावाखाली भलतेच इंजेक्शन तर विकले जात नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे.इतर मेडिकलचालकांनी इंजेक्शन लिहून दिले, त्या डॉक्टरसोबत बोलून किती किंमत आहे, त्याची माहिती देतो, असे उत्तर दिले. त्यामुळे टोकलिझुमॅब इंजेक्शनची मूळ किंमत किती व त्याची उल्हासनगरमध्ये ब्लॅकने विक्री केली जात आहे की, भलतेच इंजेक्शन हजारो रुपयांना विकले जात आहे, अशी शंका घ्यायला वाव आहे. शहरातील विविध मेडिकल स्टोअर्समध्ये असाच अनुभव आल्याने डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स यांच्या संगनमताने इंजेक्शन वाढीव किमतीला विकले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, आपल्या रुग्णाला लवकर आराम पडावा, याकरिता नातेवाईक दामदुप्पट किंमत देऊन इंजेक्शन खरेदी करीत आहेत.
भिवंडी टोकलिझुमॅब @ 45,000भिवंडी : टोकलिझुमॅब हे औषध भिवंडीतील मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नाही. काही मेडिकल दुकानदारांनी हे औषध साधारणत: ४० ते ४५ हजार रुपयांना मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काही दुकानदारांनी हे औषध ३२ ते ३५ हजार रुपयांना मिळत असल्याचा अंदाज सांगितला.काही मेडिकल दुकानदारांनी अॅडव्हान्स पैसे दिले, तर हे औषध एक दिवसानंतर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. एका दुकानदाराने हे औषध भिवंडीत कुठेच मिळणार नाही. ज्या रुग्णाला हे इंजेक्शन लागते, त्या रुग्णालयाकडूनच औषधाच्या किमतीबाबत रुग्णाच्या नातलगांना पूर्वकल्पना देऊन मागवण्यात येते, असे सांगितले.जर इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसेल, तर संबंधित रुग्णालय जेथून ते आणण्याचा सल्ला देते, तेथून रुग्णालयाच्या प्रिस्क्रिप्शनवर त्याच ठिकाणी मिळते, अशी माहिती एका दुकानदाराने दिली. मीरा-भार्इंदर टोकलिझुमॅब @70,000मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाच्या रुग्ण आणि बळींची संख्या वाढत असताना यावर प्रभावी ठरणाºया औषधांची काळ्याबाजारात दुप्पट, तिप्पट किमतीने विक्री केली जात आहे. मुंबईत वितरकांकडे ३१ हजार ६०० रुपयांना मिळणारे टोकलिझुमॅब इंजेक्शन खाजगी रुग्णालये, औषध दुकानदारांकडून ४० ते ७० हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. अन्य औषधांच्या किमतीदेखील जास्त आहेत.शहरात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली असून बळींची संख्या पावणेदोनशेच्या घरात आहे. महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचारासाठी केवळ २० आयसीयू व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. शहरात अन्य खाजगी रुग्णालयांत अतिशय तुटपुंजी वैद्यकीय सुविधा आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांना मुंबईमधील रुग्णालयात उपचारासाठी आसरा घ्यावा लागत आहे. मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनावर दिल्या जाणाºया औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना दिले जाणारे टोकलिझुमॅब हे औषध दुकानांमध्ये लगेच मिळत नाही. औषध मिळवण्यासाठी रुग्णांचे नातलग औषधांची दुकाने पालथी घालत असतात. अनेक औषध दुकानदार टोकलिझुमॅब हवे असल्यास त्याची ४० हजार रुपयांपासून ७० हजार रुपये किंमत सांगतात. वास्तविक, या औषधांची जीएसटीसह छापील किंमत ३१ हजार रुपयांच्या घरात आहे. औषध पाहिजे असेल तर अगोदर रकमेची मागणी केली जाते. पण, औषध लगेच हवे असेल, तर त्याकरिता दर वाढवून सांगण्यात येतो. एका दुकानदाराने तर चक्क ७० हजार काढा लगेच इंजेक्शन देतो, असे सांगितले. एका दुकानदाराने ४० हजारांत एकदोन दिवसांत इंजेक्शन येईन, पण १० हजार अॅडव्हान्स द्या, असे सांगितले. मीरा रोडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णाला टोकलिझुमॅब देण्याकरिता ४८ हजार रुपये दुकानदाराने मागितले. शेवटी, त्यांच्या परिचिताने ओळख काढून घाटकोपरवरून तेच औषध कंपनीच्या वितरकाकडून ३१ हजारांत आणले. महत्त्वाचे म्हणजे, औषधांचा काळाबाजार जेवढ्या जोमात सुरु आहे, हा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा तेवढीच सुस्त झाली आहे.मागणी करूनही पुरवठा होत नाहीकाही मोठ्या औषध दुकानदारांनी सांगितले की, टोकलिझुमॅबची किंमत ३१ हजार रुपयेच असून आम्ही मागणी करून आठवडा झाला तरी कंपनीने अजून औषधाचा पुरवठा केलेला नाही. औषध तुटवड्याचा गैरफायदा घेऊन अनेक खाजगी रुग्णालये व विक्रेते कोरोना रुग्णांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरण्याचे काम करीत आहेत.