नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी मनपाचे सफाई कर्मचारी सुरेश रामा जाधव (वय ५५ वर्ष ) यांचे कोरोना आजाराने रविवारी निधन झाले आहे. युवा कवी मिलिंद जाधव यांचे ते वडील होते. त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी, ३ मुलं, २ सुना, २ भाऊ, ४ बहिणी, ३ नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान कोरोना संकटात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याने कामगारांचा मृत्यू होत असून कामगारांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळें महागडे उपचार घेणे मनपा कामगारांना शक्य नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असून जाधव यांच्या मृत्यूने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुरेश जाधव हे मनपा मध्ये १९८५ मध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाले होते. प्रभाग समिती ५ अंतर्गत कॅबिन क्रमांक १३, वार्ड क्र. पाच ड मध्ये सफाई कामगार म्हणून सध्या कार्यरत होते. गेल्या ३६ वर्ष त्यांनी आपली प्रामाणिक सेवा महानगर पालिकेला दिली आहे. त्यांच्या अचानकपणे कोरोनाचा विळख्यात जाण्याने मनपा कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्ती केली जात आहे. सुरेश जाधव यांना मनपाच्या खुदा बक्ष हॉल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते परंतु तेथे त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्यांना मृत्यूला बळी पडावे लागले असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून मृत्युदर देखील वाढले आहे. दरम्यान मनपा सफाई कामगारांना कोरोना संकटात आवश्यक साधन सामुग्री देण्याची मागणी विविध पक्ष, संघटना व कामगार युनियन यांनी वेळोवेळी केली असून मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आजही कामगारांना अत्यावश्यक साधन सामुग्री दिली नसल्यानेच मनपाचे सफाई कामगार सुरेश जाधव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप लेबर फ्रंट युनियनचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी केला आहे.