जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांच्या दृष्टीने एक सकारात्मक बातमी असून गेल्या २४ तासांमध्ये बाधित पोलिसांचे प्रमाण हे अत्यंत कमी आले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांसह सहा पोलिसांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून ‘मिशन झिरो’ अंतर्गत मोबाईल डिस्पेन्सरीमार्फतीने राबविलेल्या एका विशेष मोहीमेचाही हा परिणाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आतपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ८३ अधिकारी आणि ७१३ कर्मचारी अशा ७९९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल ६४१ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५८ कर्मचाºयांना धरी कॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या तसेच त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठीही पोलिसांकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण आयुक्तालयात ७० ते ८० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच कंटेनमेंट झोनच्या ठिकाणीही पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. हा बंदोबस्त सुरु असतांनाच अनेक पोलीसही कोरोना बाधित झाले. यामध्ये पाच पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांमधील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देश अपनाये, एमसीएचआय आणि क्रेडाई या खासगी संस्थांच्या मदतीने मोबाईल डिस्पन्सरीच्या मार्फतीने २६ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमधील चार हजार ६० पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी केली. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या ४४७ पोलीसांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील १२४ पोलिसांना लागण झाल्याचे आढळल्यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांमध्येही अनेक प्रकारची जागृती तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम पाळूनच कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच आता कोरोना बाधित पोलिसांच्या संख्येत लक्षणीय घट आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ आरोपींना अटक करतांनाही अनेक प्रकारे काळजी घेतली जात आहे. विविध प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळेच आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त ठाणे शहर