लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना आणि पावसाळा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी चिरागनगर, धर्मवीर आनंदनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवन याठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. चिरागनगर येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांनी रुग्णांचीही विचारपूस केली.महापालिका आयुक्त हे गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी करुन त्याठिकाणी कोवीड १९ आणि पावसाळयाच्या अनुषंगाने काय उपाययोजना केल्या आहेत, त्याचबरोबर कोणत्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, याचा आवर्जून आढावा घेत आहेत. १७ जुलै रोजी सकाळी आयुक्त डॉ. शर्मा यांनी अशाच पाहणीदरम्यान चिरागनगर आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधून रूग्णांचीही चौकशी कोली. यावेळी त्यांनी चिरागनगर परिसराच्या स्वच्छतेची पाहणी करून तेथील नागरिकांशीही संवाद साधत विचारपूस केली. त्याचदरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे प्रस्तावित संसर्ग चाचणी केंद्रालाही भेट दिली. या ठिकाणी अँटीजन किटसच्या माध्यमातून कोवीड १९ ची चाचणी केली जाणार आहे.यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद नगर येथे ‘मिशन झिरो’ मोहिमेतंर्गत सुरू केलेल्या मोबाईल डिस्पेन्सरी सेंटरही त्यांनी भेट दिली. तेथील डॉक्टरांशी आणि रूग्णांशी बातचीत केली. तसेच त्यांनी डॉ.काशीनाथ घाणेकर नाटयगृह येथील चाचणी केंद्राचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी आणि अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते.