- वसंत भोईर
वाडा : वाडा व नजीकच्या जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तालुक्यांतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील पोशेरी येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कोविड सेंटरमध्ये असुविधांचा पाढा आहे. बुधवारी रात्री सुमारे तीन ते चार तास वीज गायब झाल्याने व जनरेटरमध्येही बिघाड झाल्याने ऑक्सिजन सुरू असणाऱ्या रुग्णांची मात्र पुरती गैरसोय झाली. याशिवाय येथे व्हेंटिंलेटर नाही, की रेमडेसिविर इंजेक्शनचा पत्ता नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची सेवा रामभरोसे सुरू असल्याचा आरोप रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. आरोग्य प्रशासनाने यासाठी विभागवार कोविड सेंटर उभारली आहेत. वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या तालुक्यांसाठी वाड्यातील पोशेरी येथे आणि विक्रमगड येथील रिव्हेरा येथे, अशी दोन कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. रिव्हेरा हे सुसज्ज सेंटर असून, येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, पोशेरी येथील कोविड सेंटरवर असुविधाच खूप आहेत.या सेंटरमध्ये व्हेंटिलेटर, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पत्ताच नाही. या रुग्णालयात रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात अन् रुग्णांची प्रकृती खालावली, तर त्याला पुढे रिव्हेरा येथे हलविण्यात येते.पोशेरी येथे एकूण १९८ रुग्ण उपचार घेत असून, बुधवारी रात्रीच्या सुमारास या सेंटरमध्ये वीज गायब झाली ती पुन्हा तीन ते चार तासांनी आली. त्यातच येथील जनरेटरमध्येही बिघाड झाल्याने आधीच उकाडा, त्यात वीज गायब झाल्याने रुग्णांची झोपच उडाली. ज्या रुग्णांना ऑक्सिजन लावले होते, त्यांची पुरती गैरसोय झाली. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन करून असुविधांचा जाब प्रशासनाला विचारला. यावेळी उपस्थित डाॅक्टरांची भंबेरी उडाली होती. पालघर ग्रामीणमधील कोविड रुग्णांची आरोग्यसेवा रामभरोसे सुरू असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आदिवासी गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या प्रशासन व सरकारने या रुग्णालयात सोयी-सुविधा वेळीच पुरवल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिला आहे.
पोशेरी येथे कोविड सेंटरमध्ये एमबीबीएस डाॅक्टर नसल्याने येथे रेमडेसिविर इंजेक्शन देता येत नाही.-डाॅ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी, वाडा
बुधवारी रात्री येथील जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने व वीज गायब झाल्याने काही तास वीज गायब झाली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली.-डाॅ. सुनील भडांगे, वैद्यकीय अधीक्षक, वाडा
या कोविड सेंटरमध्ये दोन विभाग आहेत. येथे किमान दररोज शेकडो रुग्ण येत असतात. परंतु स्वच्छतेचा अभाव आहे. शौचालयाची अत्यंत दुरवस्था आहे. एक दिवस पाणीच नव्हते तर काल दोन तास वीज नव्हती. ऑक्सिजनची सुविधा नाही. १४० रुग्णांवर एकच डाॅक्टर उपचार करतात. त्यामुळे येथील परिस्थितीला कंटाळून येथे उपचार घेत असलेले रुग्ण येथून निघून जात आहेत. - एक रुग्ण, पोशेरी कोविड सेंटर