ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या बाळकुम येथील कोविड ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या भिका सखाराम वाघुले (70) यांनी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांचे ते चुलते होते.ठाण्यातील मार्केट परिसरात राहणारे वाघुले हे कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना 21 ऑगस्ट रोजी ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रस जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर 1 सप्टेंबरपासून अतिदक्षता विभागातील बेड क्रमांक-14 वर उपचार करण्यात येत होते. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक तोंडाचा ऑक्सिजन काढून या विभागाच्या खिडकीतून स्वत:ला झोकून दिले. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी कापूरबावडी पोलिसांना दिली. याबाबतचा अधिक तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस तसेच ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. अतिदक्षता विभागात डॉक्टर तसेच परिचारिकांची संख्या ही इतर वॉर्डापेक्षा अधिक असते. तरीही, ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी: संजय भोईरकोरोना बाधित वृद्धाने आत्महत्या केल्याच्या घटनेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केली आहे. यापुढे अशा प्रकारे कोणीही आत्महत्या करणार नाही, याबाबत रुग्णालय प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. एका रुग्णाला डॉक्टरांनी नातेवाईकांशी बोलण्यास मज्जाव केला. असे न होता, रुग्णाची माहिती नातेवाईकांना दिली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
धक्कादायक! ठाण्यात कोरोनाबाधित वृद्धाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 10:05 PM