ठाणे : कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्ण कसा आहे, त्याच्यावर कोणत्या प्राकारचे उपचार केले जात आहेत, त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते की नाही, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांसमोर असतात. महत्त्वाचे म्हणजे नातेवाइकांना भेटू दिले जात नसल्याने रुग्णांमध्येदेखील एकटेपणाची भावना निर्माण होते. यावर आता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्हिडीओ कॉलचा उतारा शोधला आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांमधील ताणतणाव दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.सध्या महापालिकेच्या कोविड रुग्णालयात ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली असून इतर सर्वच कोविड रुग्णालयांनी ती अमलात आणावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. कोरोना हा असा संसर्गजन्य रोग आहे की, पॉझिटिव्ह रुग्णांच्या सान्निध्यात येणाऱ्या कुणालाही त्याची बाधा होऊ शकते. म्हणूनच, सतत धावणारे जग अक्षरश: थांबले आहे.कोरोनाला हरवण्यासाठी माणसातील दरी आणि दुरी आवश्यक भासू लागली आहे. त्यामुळे ज्यांना या विषाणूने ग्रासले, त्यांना एकान्तात प्रियजनांपासून दूर राहून उपचार घ्यावे लागत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अतिशय गंभीर रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी संसर्गाच्या भीतीने मृतदेह ताब्यात घेण्यासाठीसुद्धा नातेवाईक फिरकले नाहीत, तर काही ठिकाणी अगदी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले आहेत.कोरोनाची दहशत इतकी आहे की, बाहेर पडणे किंवा बाहेरून आल्यावर सर्वात प्रथम स्वत:ला स्वच्छ करणे, सर्व वस्तू सॅनिटाइझ करून घेणे, हे अत्यावश्यक झाले आहे.त्यामुळेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाइकांचा संवादच तुटल्यामुळे गंभीर रुग्णांना एकटेपणाची भावना निर्माण झाल्यामुळे त्याची मानसिक स्थितीदेखील बिघडते. म्हणूनच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधील संवाद प्रस्थापित करण्यासाठी रुग्णालयांनीच पुढाकार घ्यावा, अशी महत्त्वाची संकल्पना शर्मा यांनी सुरुवातीला पालिकेच्याच बाळकुम येथील कोविड सेंटरपासून सुरू केली आहे.गेल्या १५ दिवसांपासून हा उपक्रम येथे सुरू केला असून या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. यामुळे त्यांच्या तक्रारींचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. म्हणूनच, यापुढे सर्व हॉस्पिटलमध्ये ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.
CoronaVirus News: व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाइकांशी संवाद; एकटेपणावर आयुक्तांनी शोधला उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:38 AM