पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६ हजारहून जास्त बाधित रुग्ण आढळले असून त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ३१ हजारहून अधिक रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे दोन लाख लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्य सरकारची योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. जिल्ह्यातील शहरे, गावे तसेच पाड्यापाड्यांवर पोहोचून प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. यातून रुग्णांच्या निकट संपर्कातील बाधितांची, तसेच संशयित रुग्णांची माहिती प्राप्त होत आहे. या योजनेतून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला संसर्ग रोखण्यात यश मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील वसई-विरार शहरे वगळता अन्य भागांत १२ हजारहून जास्त लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागांत सर्वाधिक रुग्ण पालघर तालुक्यात आढळले असून तेथील बाधितांची संख्या ६८०२ झालेली आहे. यानंतर डहाणू तालुक्यात १७३७ रुग्ण आढळलेले असून वाडा तालुक्यात १५३८ तर वसईच्या ग्रामीण भागात ११९८ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही सुमारे अडीचशे रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एकंदर ही वाढती रुणसंख्या लक्षात घेता प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांची कोविड चाचणी करण्यात आली असून माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना घरोघरी राबवली जात असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महानगरपालिका हद्दीतसध्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात आढळलेली आहे. वसई-विरारमध्ये बाधित रुग्णांची संख्या २३ हजार २२९ वर पोहोचली आहे.त्याच वेळी वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये २० हजार ८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. वसई महापालिका क्षेत्रामध्ये ४५९ रुग्णांना या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमवावे लागले असून अद्याप एक हजार ९१३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
CoronaVirus News: पालघरमध्ये दोन लाख लोकांच्या कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:30 AM