मीरारोड - भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली, डोंगरी व तरोडी भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी त्याच परिसरात उपचार केंद्राची व्यवस्था करण्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह खासदार व आमदार यांच्या मागणी नुसार चौक येथील पालिका शाळेत ८० खाटांचे कोविड उपचार केंद्र पालिकेने अवघ्या दोन दिवसांत तयार केले आहे. शनिवार १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपचार लोकार्पण होणार आहे.
भाईंदरच्या धारावी बेटावरील उत्तन, चौक, पाली, डोंगरी व तरोडी भागातील कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना उपचारासाठी भाईंदर शहरात किंवा मीरारोड गाठावे लागते. काहींना तर खाटा न मिळाल्यास मुंबईला सुद्धा जावे लागते. सदरची गावे ही शहरात ये-जा करण्यासाठी दूर पडतात जेणे करून कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातलगांना त्रास होऊन गैरसोय होते. पालिकेने नुकतीच उत्तन येथील एका खाजगी रुग्णालयास कोरोना उपचारासाठी परवानगी दिली आहे. परंतु वाढती रुग्णांची संख्या पाहता धारावी बेटा वरच कोरोना उपचार केंद्र पालिकेने सुरु करावे अशी मागणी जागरूक ग्रामस्थांसह नगरसेविका शर्मिला गंडोली आदींनी चालवली होती.
खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांनी सुद्धा उत्तन परिसरातील नागरिकांसाठी कोरोना उपचार केंद्र व्हावे ह्यासाठी बुधवारी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा, आयुक्त दिलीप ढोले, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, एलायस बांड्या, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो व जॉर्जी गोविंद, पालिका अधिकारी आदींसह चौक येथील पालिकेच्या नव्याने बांधलेल्या शाळा इमारतीची पाहणी केली होती. पाली शाळेचे बांधकाम सुरु आहे तर उत्तन शाळा लहान असून तेथे कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरु आहे.
चौकची शाळा इमारत गावाच्या बाहेर एका टोकाला असल्याने सदर शाळेत कोरोना उपचार केंद्र सुरु केल्यास परिसरातील नागरिकांची व रुग्ण आणि नातलगांची शहरात ये - जा करण्याची गैरसोय दूर होणार आहे. पाहणी दौऱ्यावेळी काही जणांनी चौक शाळेत कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यास विरोध केला असता आयुक्त ढोले यांनी, सदर शाळा इमारत पालिकेची असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य सुविधेसाठी वापर करण्यास होणारा विरोध चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
लोकांच्या जीविताचा आणि तातडीने उपचाराचा प्रश्न महत्वाचा असल्याने नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे असे आवाहन करतानाच उपचार केंद्र सुरु करण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली. नंतर विरोध करणाऱ्यांना सुद्धा त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी आयुक्तांकडे दिलगिरी व्यक्त केली. महापालिकेने चौक येथील शाळेत कोरोना रुग्णांना उपचारासाठी ८० खाटांचे सुसज्ज उपचार केंद्र तयार केले आहे . उत्तन - चौक परिसरातील नागरिकांना पालिकेची मोफत उपचाराची सुविधा तयार झाली असून १ मे रोजी पासून उपचार केंद्र सुरु केले जाणार असल्याचे उपायुक्त डॉ . संभाजी वाघमारे यांनी सांगितले.