ठाणे : मुंबईप्रमाणेच ठामपा क्षेत्रातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लपवाछपवी सुरू आहे. आरोग्य विभाग व ठामपाने जाहीर केलेल्या रुग्णसंख्येत एक हजार १५५ रुग्णांची तफावत असल्याचा आरोप करत, याबाबत चौकशी करून खरी आकडेवारी जनतेसमोर आणण्याची मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.ठामपातर्फे दररोज सायंकाळी रुग्णांचे मृत्यू, बाधित रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जाहीर केली जाते. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फेही वेबसाइटवर आकडेवारी प्रकाशित केली जाते. मात्र, या आकडेवारीत तफावत दिसते. ठामपातर्फे १५ जूनला सायंकाळी कोरोनामुळे १६३ मृत्यू व ५,०५६ बाधित असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सरकारतर्फे त्याच दिवशी रात्री १० वाजता जाहीर केलेल्या यादीत १६७ मृत्यू आणि ६,२११ रुग्ण बाधित असल्याचे दिसते. मृतांच्या संख्येत ४ व बाधितांच्या संख्येत एक हजार १५५ रुग्णांचा फरक आढळत आहे. त्यामुळे ठाण्यातही रुग्णांची आकडेवारी लपविली जात आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
CoronaVirus News: ‘ठाण्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत लपवाछपवी’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:38 AM