भिवंडी : येथील अंजूरफाटा ओसवालवाडीच्या मागे राहत असलेल्या एका आठ महिन्याच्या चिमुरडीने कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी या मुलीला तिच्या आईसह घरी सोडण्यात आले. घरी परतताच इमारतीमधील रहिवासी व तिच्या कुटुंबीयांनी फुलांचा वर्षाव करत या मायलेकींचे स्वागत केले.
नऊ दिवसांपूर्वी या मुलीच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. याआधी उपचारानंतर या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठवले होते. शुक्रवारी या चिमुरडीला व तिच्या आईला घरी सोडले. याप्रसंगी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिल थोरात, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना, दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. नागरिकांनी धैर्याने सामना केल्यास कोरोनावर मात करू शकतो, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त मुलीच्या आईसह कुटुंबीयांनी दिली आहे.