लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्याच्या काळात उद्भवणा-या हिवताप आणि कावीळसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हिवताप निर्मूलन विभागाकडून केले जाते. त्यात सध्या कोरोनासारख्या जागतिक साथीच्या आजारांवरही नियंत्रण मिळविण्यासाठी या विभागातील कर्मचारी अगदी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण आहे. कोरोनामध्ये काम करूनही वेतन विलंबाने का दिले जाते, असा सवालही आता या कर्मचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने आरोग्य विभागासह विविध विभागांतील कर्मचारीदेखील या युद्धात सहभागी केले आहेत. त्यानुसार, कोरोनाबाधित रु ग्णांना विलगीकरण कक्षात नेणे, त्यांचा अहवाल अद्ययावत करणे आदी महत्त्वाची कामे या कर्मचा-यांवर सोपविण्यात आली आहेत. त्यात पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी याच विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे यंदा या विभागातील कर्मचा-यांना दोन आजारांशी लढा द्यावा लागत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ५०० ते ५५० हिवताप निर्मूलन विभागातील कर्मचारी जीवाची पर्वा न करता तसेच आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहून कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. एकीकडे कोविड योद्धे म्हणून काम करायचे? मग, त्यांचे वेतन वेळेवर का नको द्यायला, असा सवालही हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे केला आहे.
‘‘अगदी अलीकडेच जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये कर्मचा-यांची कार्यालयीन संख्याही कमी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बरीच कामे करावी लागतात. पण, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.’’डॉ. महेश नगरे, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, ठाणे