ठाणे : कोरोनाचे (कोविड -19) संकट अद्यापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. 15 ऑगस्टनंतर शहरातील P1 व P2 नुसार ज्या आस्थापना सुरू होत्या. त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्री 7.00 पर्यंत सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केटस्, जीम व स्वीमिंग पूल बाबत आढावा घेवून त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान, यावेळी शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाईम स्लॉट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली पार पडलेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी कोरोना कोविड 19 चे संकट अद्यापही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे ही वस्तूस्थिती असली तरी प्रत्येकाचा जीव वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.
गणेशोस्तव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या कालावधीत गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, दुकानामध्ये काम करणा-या सर्वांची चाचणी करणे या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे सांगून राज्य शासनाने, तसेच महापालिका प्रशासनाने ज्या अटी आणि शर्थी घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापा-यांची असेल अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रूग्ण दुप्पटीचा वेगही 90 दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 3.5 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे असे सांगून शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, मॉल्स, मार्केटस्, स्वीमिंगपूल, जीम बाबत प्रशासनाने आढावा घ्यावा व त्यानंतर त्याचा निर्णय घेवू असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे यांच्या हस्ते डीजीठाणे प्रणालीव्दारे ऑनलाईन गणेश विर्सजन बुकिंग स्लॉट सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
महापौर नरेश म्हस्के यांनी लॉकडाऊनचा निर्णय हे नागरिकांच्या भल्यासाठीच घेतला होता असे सांगून लॉकडाऊन बंद केल्यानंतर व्यापा-यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यापारी संघटनांनी सर्व आस्थापना सुरू करण्यबाबत केलेल्या विनंतीनंतर महापालिका प्रशासनांचे भूमिका स्पष्ट करून याबाबत आमची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोरोनाविषयी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाड, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते.