अंबरनाथ: अंबरनाथमध्ये गुरुवारी एकाच दिवशी 73 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याने त्यांना नेमके ठेवायचे कुठे हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर होता. त्यातील बहुसंख्य रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र चिंचपाडा भागातील दोन कोरोनाग्रस्त रुग्ण हे शुक्रवारी सकाळी परिसरामध्ये मुक्त संचार करीत असताना दिसले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोन्ही रुग्णांना तात्काळ पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसांगणिक वाढत आहे. त्यातच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात येणारे रुग्णालय अद्यापही पूर्ण न झाल्याने वाढणाऱ्या रुग्णांना नेमकं ठेवावं कुठे हा प्रश्न पालिका प्रशासनाकडे पडला आहे. त्यातच गुरुवारी तब्बल 73 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पालिका प्रशासनाने काही रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये हालविले तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळत होते त्या रुग्णांना सिटी कोविड केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले, तर उर्वरित काही रुग्णांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी चिंचपाडा भागातील दोन कोरोनाग्रस्त रुग्ण हे परिसरामध्ये फिरताना दिसत होते. या रुग्णांना घरातच क्वारंटाईन केलेले असतानादेखील ते घरात राहत नसल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. चिंचपाडा भागातील हे दोन्ही रुग्ण बाहेर फिरत असल्याने समूह संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण स्वतःची काळजी न घेता घराबाहेर पडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.