- सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोना महामारीत रात्रंदिवस काम करणाºया पाच पोलिसांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला उघड्यावर पडू न देता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. पाचपैकी चार जणांच्या कुटुंबांना सरकारचे ५० लाख रुपयांच्या मदतीसह इतर फायदे तसेच एका मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिराम गिरी, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे विजयकुमार बनसोडे, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे प्रशांत काकडे व हिललाइन पोलीस ठाण्याचे घोडके यांचा कोरोना महामारीत कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. पोलीस कुटुंबावर दु:ख कोसळून त्यांचे संसार उघडे पडले होते. मात्र, तत्कालीन पोलीस उपायुक्त विजयकुमार शेवाळे, सहायक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे ठाकले. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे हवालदार गिरी यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. एक मुलगा १७, तर दुसरा २० वर्षांचा आहे. स्वत:चे घर असले, तरी दरमहा घराचे हप्ते भरावे लागतात, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. टेळे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने गिरी यांच्या कुटुंबाला सरकारचे ५० लाख साहाय्य मिळवून दिले. तसेच पोलीस विशेष निधीतून १० लाख, एका खासगी कंपनीचे तीन लाख, लालबागचा राजाकडून एक लाख, पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख ८० हजार, तसेच गिरी यांच्या पोलीस मित्रांनी दोन लाख ५० हजार अशी ७५ लाखांपेक्षा जास्त मदत देण्यात आली. तसेच मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे, हे विशेष.अंबरनाथ पोलीस ठाण्यात प्रतिनियुक्तीवर असलेले जयसिंगराव घोडके यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत मिळवून देऊन दोनपैकी मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हवालदार विजयकुमार बनसोडे यांची दोन्ही मुले शिक्षण घेत असून त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळाले. सरकारी इतर फायद्यांबाबत प्रक्रिया सुरू आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत काकडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. त्यांनाही सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी प्रक्रिया वेगात सुरू आहे.मदत त्वरेने झाली मंजूरहिललाइन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घोडके तसेच त्यांच्या जुळ्या भावाचा अंबरनाथ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना ५० लाखांची मदत त्वरेने मंजूर झाली असून इतर प्रक्रिया सुरू आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिली आहे.
CoronaVirus News: उल्हासनगरमध्ये अधिकाऱ्यांकडून चांगली कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:44 PM