- सदानंद नाईकउल्हासनगर : अंबरनाथमधील एक जण उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, शनिवारी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच गोंधळ उडाला. या रुग्णाला अंबरनाथ व उल्हासनगरमधील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने गोंधळात भर पडली. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी त्या रुग्णाला रात्री उशिरा उल्हासनगरच्या कोरोना रुग्णालयात दाखल केले. या रुग्णामुळे मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आले.अंबरनाथच्या एका रुग्णावर मध्यवर्ती रुग्णालयात सामान्य वॉर्डामध्ये उपचार सुरू होते. दुपारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्मचारी व अन्य रुग्णांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी यांनी उल्हासनगर व अंबरनाथ येथील कोविड रुग्णालयाशी संपर्क साधून, या रुग्णाला त्वरित घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, दोन्हीकडून रात्री उशिरापर्यंत टोलवाटोलवी सुरु केली. अखेर, तडवी यांनी रुग्णालयातील वातावरण पाहून एका पत्रकाराला याची माहिती दिल्यावर चक्रे फिरली. सामाजिक कार्यकर्ते रगडे यांनी पुढाकार घेऊन या रुग्णामुळे इतरांना संसर्ग झाल्यास तुम्ही जबाबदार राहणार का, असा दम कोविड रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भरल्यावर रात्री साडेनऊ वाजता या रुग्णाला उल्हासनगरमधील कोरोना रुग्णालयात दाखल केले.ओपीडीत ६०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंदमध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर येथून रुग्ण उपचारासाठी येतात. महिन्याला ५०० पेक्षा जास्त मुलांचा जन्म होतो. कोरोनाचा संसर्ग असतानाही ओपीडीमध्ये ६०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते, अशी माहिती डॉ. तडवी यांनी दिली.मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असलेले १५ पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कात आलेले तीन वैद्यकीय अधिकारी, आठ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तडवी यांनी दिली.
CoronaVirus News: कोरोनाबाधिताला घेण्यास रुग्णालयाची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 1:36 AM