लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ३२८ कंटेनमेंट झोनमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, लॉकडाऊन अंशत: ठेवायचे की पूर्णत: याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे ठाणेकरांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये करडी नजर ठेवण्यासाठी राज्य राखीव दलासह पोलिसांची जादा कुमक तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात सोमवारी पालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अविनाश अंबुरे आणि अतिरिक्त पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यात शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक झाली. याच बैठकीमध्ये शहरात २ जुलैपासून संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आधी घेण्यात आला आला होता. मात्र, त्यावर पूर्णपणे एकमत होऊ शकले नाही. केवळ हॉटस्पॉटच नव्हे तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरातील इतर भागातही कडक निर्बंध लावण्याबाबत चर्चा झाली. त्याचवेळी राज्य शासनाने १ जुलैपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचवेळी ठाणे महापालिकेनेही २ ते ११ जुलैपर्यंत शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याची माहिती सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाली होती. परंतू, राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रीया सुरु केलेली असतांना जनजीवन काहीसे पूर्वपदावर येत आहे. मुंबईसारख्या मोठया महानगरात ठाणे शहरातून उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालयांमध्ये जाणारा मोठा वर्ग आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अंशत: ठेवायचे की पूर्णत: याबाबतचा निर्णय विचाराधीन आहे. सध्या हा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी कंटेनमेंटझोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येतील, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले. ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटरवर लॉकडाऊन जाहिर झाल्याची माहिती एका निरीक्षकाने अनावधानाने दिल्याने यात काहीसा गोंधळ उडाल्याचेही फणसळकर यांनी स्पष्ट केले.* शहरातील कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, वर्तकनगर, मानपाडा, माजीवडा, नौपाडा आणि कोपरी अशा सर्वच भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ मेडीकल, रुग्णालय, दूध विक्री सुरु राहणार असून भाजीपालाही विक्रीवरही निर्बंध राहणार आहे.* या बंदोबस्तासाठी वागळे इस्टेटमध्ये २२५ तर ठाणे शहरात २०० जादा पोलिसांची कुमक तेैनात राहणार आहे. त्याशिवाय, राज्य राखीव दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाच्या १०० जवानांचाही यामध्ये समावेश आहे. शहरात वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक कंटेनमेंट झोन असून ३२८ झोनमध्ये हे निर्बंध राहणार आहेत.
‘‘ नागरिकांनीही अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळावेत. लॉकडाऊन अंशत: ठेवायचे की पूर्णत: याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे तूर्तास तरी कंटेनमेंट झोनमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. ’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर