कल्याण : कोरोनाच्या चाचण्या वाढविल्याने मृत्युदर कमी झाला आहे. तसेच सगळीकडे कोविड क्वारंटाइन सेंटर, केअर सेंटर आणि रुग्णालये चांगल्या आरोग्य सुविधांयुक्त उभारल्याने कोरोना नियंत्रणात येत असला तरी तो शून्यावर गेला पाहिजे. ‘एमसीएचआय क्रेडाई ’ने त्यासाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे, असे उद्गार पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे काढले.शहरातील आधारवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे एमसीएचआय क्रेडाई या बिल्डर संघटनेने सुरू केलेल्या ‘मिशन झीरो कोविड केसेस’ या मोहिमेचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आाला.याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी रवी पाटील, मनोज राय, राजन बांदेलकर आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, २४ दिवसांत एक हजार बेडचे कोविड रुग्णालय उभारणे, हा विनोद नाही. सध्या तात्पुरती उभारलेली कोविड रुग्णालये कायमस्वरूपी करा, अशी मागणी उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून होत आहे. कोरोनाशी लढा देताना डॉक्टर आठ तासांपेक्षा जास्त तास पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. मी स्वत: पीपीई किट घालून रुग्णांची विचारपूस केली आहे. दोन तास जरी पीपीई किट घातले, तरी जीव गुदमरल्यासारखा होतो. डॉक्टर कसे काय आठ तासांपेक्षा जास्त काम करतात? त्यांच्या सेवेवर टीका करणे, हे योग्य नाही. दुसऱ्यांचा जीव धोक्यात असेल तर, आपला जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचविला पाहिजे, ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.ते पुढे म्हणाले, एमएमआर क्षेत्र व राज्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवले, त्यामुळे मृत्युदर कमी झाला. परंतु, जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुुंबई, ठाणे येथे एमसीएचआयने मिशन झीरो कोविड केसेस ही मोहीम सुरू केली आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत आजपासून ती सुरू होत आहे. हे सांगताना एमसीएचआयच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शिंदे यांच्या हस्ते कोरोना जागृतीच्या पाच व्हॅन व कोरोना अॅण्टीजेन टेस्टच्या पाच फिरत्या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.
CoronaVirus News: कोरोना चाचण्या वाढवल्याने मृत्युदर घटला- पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:36 AM