लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे मृत्यू झालेले ठाणे महानगरपालिकेतील कळव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांचे पती कै. मुकुंद केणी यांच्या अंत्यविधीचा बनावट व्हिडिओ सध्या सोशल मिडियातून व्हायरल करण्यात आला आहे. या विरोधात आता मुकूंद यांचे पुत्र मंदार केणी यांनी कळवा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दखल केली आहे. बनावट व्हिडिओ व्हायरल करून केणी कुटुंबियांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून या सर्व प्रकारामुळे मोठया प्रमाणात सामाजिक आणि मानसिक हानी झाली असल्याचे या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे. जाणूनबुजून केणी कुटुंबियांच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी देखील त्यांनी तक्रारीमध्ये केली आहे.मुकुंद केणी यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर दुस-या दिवशीच त्यांच्या अंत्यसंस्काराचे बनावट व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे व्हायरल करण्यात आले. यामध्ये त्यांच्या संपत्तीचाही उल्लेख करण्यात आला होता. या सर्व प्रकाराची गंभीर दाखल घेऊन मंदार केणी यांनी थेट कळवा पोलीस ठाण्यात १६ जून रोजी रितसर तक्रार दाखल केली. मंदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जो फेक व्हिडिओ त्यांच्या वडिलांबद्दल व्हायरल करण्यात आला, तो त्यांच्या अंत्यविधीचा नसून वेगळा व्हिडिओ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकारामुळे मुकुंद केणी यांच्या संदर्भात खोटी माहिती सोशल मीडियामध्ये टाकून त्यांना आणि संपूर्ण केणी कुटुंबियांना बदनामीचा घृणास्पद प्रकार आहे. हा सर्व प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई केली जावी, त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसेल अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, नागरिकांनीही अशा प्रकारे कोणाच्याही अंत्यविधीची व्हायरल झालेले व्हिडिओ कोणतीही खात्री न करता कुठेही विनाकारण फॉरवर्ड करु नये, असे आवाहन कळवा पोलिसांनी केले आहे.
‘‘यासंदर्भात मंदार केणी यांची तक्रार आली आहे. सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला जाईल. विनाकारण नागरिकांनीही असे अंत्यविधीची बनावट व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे आहे. चौकशीतून संबंधिताचा शोध घेतला जाईल. ’’विजय दरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा