- वसंत भोईरवाडा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात. अनेकजण घरच्या घरी वेगवेगळे उपाय करतात. विविध पदार्थांचे सेवन करतात. या आजारावर मात करण्यासाठी व शरीरात प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. त्यामुळे या फळांना मागणी वाढली असून त्याचे दरांमध्येही वाढ झाली आहे. ही दरवाढ सामान्यांना परवडत नसली तरी सामान्यांकडून याची सर्रास खरेदी केली जाताना दिसते.
कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य जनता आपापले घरगुती काढे, ज्यूस, औषधोपचारही करताहेत. कोरोना काळात दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने जुस साठी देखील या फळांना वाढती मागणी आहे.
या फळांमध्ये व्हीटॅमीन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. त्यामुळे ही फळे खाणे गरजेचे आहे.- डाॅ. समाधान पगारे, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडूस
कोरोना रूग्णांनी दैनदिन आहारामध्ये लिंबू, मोसंबी, संत्री ही फळे खाणे गरजेचे आहे. त्यातून व्हीटॅमीनसीचे सेवन होते,- डाॅ. गिरीश चौधरी, कुडूस
फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढकोरोनाच्या आजारावर उतारा म्हणून या फळांकडे पाहिले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता नसल्याने फळांच्या किंमतीत २५टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कुडूस येथील फळ विक्रेते शैलेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.