मीरा रोड - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एकीकडे चिंता वाढत असताना दुसरीकडे लॉकडाऊन असूनदेखील खुद्द मीरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे व अन्य तीन भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात बेकायदेशीर बांधकामे मात्र उघडपणे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिका प्रशासन देखील या अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ करत आहे. आपण याबाबत आयुक्तांना तक्रार केल्याचे महापौर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे धारावी झोपडपट्टीचे स्वरूप आलेल्या काशिमीराच्या माशाचा पाडा मार्ग, मीनाक्षी नगर, मांडवी पाडा, डाचकूल पाडा आदी परिसरात कोरोनाच्या संसर्ग काळात देखील बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. मुळात हा परिसर ना विकास क्षेत्र , इको सेन्सिटिव्ह झोन, पालिका आरक्षण तसेच आदिवासी मालकीच्या जमिनी अशा क्षेत्रात मोडत असताना देखील येथे राजरोसपणे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकारणी व झोपडीमाफीयांच्या संगनमताने प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. परंतु सदर बेकायदा बांधकामांवर व बांधकामे करणाऱ्या माफियांवर ठोस कारवाई करणे तर सोडाच उलट वीज, पाणी, कर आकारणी आदी सर्व सोयी-सुविधा करून दिल्या जात आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे येथील विकास नियोजनाचा बट्ट्याबोळ झालेला असून, नागरी समस्या वाढत आहेत. येथील आरक्षणाच्या जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. अधिवेशनात देखील येथील आदिवासींच्या जमिनी वरील बेकायदा बांधकामांबाबत मुद्दा उपस्थित केला गेला होता. या पालिका प्रभाग 14 मध्ये भाजपाचे सचिन म्हात्रे, मीरादेवी यादव, सुजाता पारधी आणि ज्योत्स्ना हसनाळे असे चार नगरसेवक असून, अनिल भोसले हे माजी नगरसेवक आहेत. ज्योत्स्ना तर आता आता तर शहराच्या प्रथम नागरिक आहेत. परंतु महापौरांच्या प्रभागातच कोरोनामुळे बंदी असून देखील येथील मीनाक्षी नगर, मांडवी पाडा, डाचकुडा आदी भागात सर्रास बेकायदा बांधकामे सुरू आहेत. आधीच्या बांधकामांवर कारवाई करणे सोडाच पण सदर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांबाबत देखील कारवाईस कमालीची टाळाटाळ केली जात आहे. वास्तविक बांधकाम करण्यास बंदी असताना यासाठी सिमेंट, विटा, रेती आदी साहित्य तसेच मजूर कुठून आणले, असा प्रश्नसुद्धा येथील जागरूक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनासुद्धा जबाबदार धरून ठपका ठेवा, अशी मागणी मनसेचे दिनेश कनावजे आदींनी केली आहे.
याबाबत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात संताप व्यक्त केला. अशा माफियांवर कठोर कारवाई करा. त्यांची हिम्मत होतेच कशी? पालिका अधिकारी करतात तरी काय ? असा सवाल केला. आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले असल्याचे त्या म्हणाल्या.