लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनासंदर्भात संशोधन आणि व्हेंटिलेटर तयार करण्याच्या नावाखाली येऊर येथील ‘सुपरवासी’ या एनजीओने वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने आणून मानसिक छळ केल्याची तक्रार नऊ इंजिनिअर तरुणींनी ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे बुधवारी केली. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि वर्तकनगर पोलिसांच्या मदतीने या नऊ मुलींची सुटका करण्यात आली.या सामाजिक संस्थेचे येऊर येथे संशोधन सुरु आहे. याच संस्थेने आॅनलाईन जाहिरात देऊन व्हेंटिलेटर बनविणे आणि फुफ्फुसांच्या स्वच्छतेवरील औषधांच्या संशोधनासाठी काही तंत्रज्ञ मुलींची याठिकाणी भरती केली. यामध्ये या उच्च शिक्षित नऊ तरुणींचाही समावेश आहे. यातील बहुतांश तरुणी या केरळसह इतर परराज्यातील आहेत. संस्थेच्या ठिकाणी मोबाईलवर बोलण्यास बंदीसह दर १५ मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर मेडिटेशन करावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरेही बसविले आहेत. शिवाय कुटूंबियांशीही बोलण्यास परवानगी नाही. अशा अनेक जाचक अटींना त्रासून यातील एका मुलीने थेट तिच्या वडिलांशी संपर्क साधला. याच मुलीच्या वडिलांनी ही तक्रार भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष डावखरे यांच्याकडे केली. त्यानुसार भाजपाच्या नौपाडयातील नगरसेविका मृणाल पेंडसे, सरचिटणीस विलास साठये, रमेश आंब्रे, सचिन मोरे, अश्विन शेट्टी, प्रशांत मोरे आणि राजेश बोराडे आदींनी या प्रकाराची वर्तकनगर पोलिसांच्या मदतीने या संस्थेत बुधवारी सायंकाळी पाहणी केली. यात दर तीन महिन्याने दहा हजारांच्या वेतनवाढीसह नऊ महिन्यांपर्यंत सहा लाखांचे पॅकेज या मुलींना नियुक्तीपत्राद्वारे दिले होते. त्यानुसार २८ आॅगस्ट रोजी त्या नोकरीवर दाखल झाल्या. मात्र, फोन वापरण्याच्या बंदीबरोबरच त्यांचा इतरही मानसिक छळ झाल्याचा या मुलींचा आरोप आहे. तुम्हाला गॉड बनवित असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. त्याला नकार देणाऱ्या तरु णींना दमदाटी केली जात होती. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर येऊरच्या पाटोणपाडा येथील सुपरवासी फाऊंडेशनमधून या तरु णींची भाजप कार्यकर्त्यांनी सुटका केली. त्यांच्यातील दोन परदेशी तरुणींनी मात्र तिथून बाहेर पडण्यास नकार दिला. आता या सर्व तरु णींच्या पालकांशी संपर्क साधला जात आहे. तूर्तास त्यांना एका वसतीगृहात ठेवण्यात येणार असून गुरुवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘‘ या मुलींचे जबाब घेतले जात आहेत. त्या स्वेच्छेने रितसर तिथे नोकरीवर होत्या. त्यांनी कोणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही. याठिकाणी संशोधनाचे काम असल्यामुळे परिसरात सीसीटीव्ही आहेत. या मुलींच्या बेडरुममध्ये नाहीत. संस्थेच्या अटी मान्य नसल्यामुळे या मुलींना नोकरी सोडायची होती. मात्र, करार मध्येच तोडता येत नाही. असा संस्थेचा पवित्रा होता. तूर्तास तरी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही.’’संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे