पालघर/बोर्डी : डहाणू आणि तलासरी तालुक्यात ‘ब्रेक द चेन’ आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा किराणा दुकान आणि लग्न व हळदी कार्यक्रम आदींवर डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या गस्तीपथकाने कारवाई केली. दरम्यान, लग्न समारंभात ४०० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्याने कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी यजमान शिक्षक आणि पोलीस पाटील यांना बडतर्फ करण्यात आले आहे.शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून हा प्रकार घडला अथवा नियमबाह्य घटनेत त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी दिला आहे. डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने १५ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीत भेट दिली. यावेळी राजेश गणपत बसरा यांचे दुकान सुरू होते. यावेळी सामानाची विक्री करण्यात येत होती. या पथकाने दुकानमालक बसरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दुकान सील केले. तर बहारे बामणवाडी येथे देवराम महादेव दांडेकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा व हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता.
शाळेतही रंगली चर्चा ४०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यावेळी दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दांडेकर हे आश्रमशाळेत शिक्षक असून सेवेतील व्यक्तीने बेजबाबदार वर्तन केल्यामुळे आशिमा यांनी गुरुजींची शाळा घेतल्याची चर्चा रंगत आहे.