ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उत्तम उपचार केले जातात, असा दावा पालिकेकडून केला जात होता. परंतु आता याच कोविड सेंटरमध्ये तीन बोगस डॉक्टर आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेवरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. तर या संदर्भात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
ठाण्यात बोगस डॉक्टरांच्या घटना अनेकवेळा पाहिल्या आहेत. परंतु आता ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णालयातच बोगस डॉक्टर पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व गोरगरीब रुग्णांना कोविड रुग्णालय उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने जवळपास ११०० खाटांचे हे रुग्णालय उभे केले आहे. परंतु सुरूवातीच्या टप्यात या रुग्णालयात डॉक्टर उपलब्धच होत नसल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर टप्याटप्याने येथे डॉक्टर घेतले गेले. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणा-या रुग्णांना त्याचा फायदाही झाला. किंबहुना गोर गरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय नवसंजीवनीच ठरल्याचे दिसून आले. परंतु आता याच रुग्णालयात बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामध्ये दोन इंटरशिप पूर्ण न केलेले तर १ डॉक्टर हा विद्यार्थी अशा तीन बोगस डॉक्टरांना पालिकेच्या आरोग्य विभागाने पकडले आहे. त्यानंतर आता या तिघांच्या विरोधात अहवाल तयार करण्यात आला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तर तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविण्यात आले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने या डॉक्टरांची भरती करण्यासाठी खाजगी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्याच्याच माध्यमातून ही भरती प्रक्रिया झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु केवळ हा ठेकेदाराच दोषी आहे का?, पालिकेने या गोष्टींकडे लक्ष देणो गरजेचे होते, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान, या संदर्भात चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त शर्मा यांनी दिले आहे.
ते दोघे आयसीयुमध्ये होते रुग्णांची देखभाल करीतआयसीयुमध्ये रुग्ण दाखल असल्यास त्याच्यावर देखरेख करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यानुसार महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्येही तसे तज्ज्ञ डॉक्टर होते. परंतु त्यांच्या मदतीला इंटरशीप पूर्ण न केलेले ते दोन डॉक्टर देखील आयसीयुमध्ये रुग्णांची देखभाल करीत असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे.