मीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकारी आता नागरिकांना थेट भेटणार नाहीत. अर्जदार नागरिकांना सोमवार १९ एप्रिलपासून ऑनलाईन भेटून त्यांच्या समस्या पोलीस अधिकारी सोडवणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांना सुद्धा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात तसेच विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात थेट जाता येणार नाही. पोलीस आयुक्तालयाने नागरिकांसाठी ८५९१३३६६९८ हा व्हॉट्सअॅप क्रमांक तसेच आयुक्तालयाच्या ईमेल आयडीवर तक्रारी, समस्या पाठवण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संभाषण साधायची वेळ व दिनांक सुद्धा आधी द्यायचा आहे. त्यानंतर पोलीस विभागाकडून नागरिकांना ऑनलाईन भेटीची वेळ व दिनांक कळवळी जाणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी रोज दुपारी ३ ते ५ या वेळेत ई - भेट म्हणजेच ऑनलाईनद्वारे पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नागरिकांच्या समस्या, तक्रारी वर थेट चर्चा करतील व निराकरण करतील.
२३ एप्रिलपासून दर शुक्रवारी अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्याशी सुद्धा ई - भेट पद्धतीने संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतील. कोरोनाचा संसर्ग वाढत असून संचारबंदी असल्याने नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडू नये. यासाठी सदर ई भेट सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे .