सुरेश लोखंडेठाणे : कोरोना महामारीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी एकमेव आधार ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ दहा टक्के नागरिकांना देण्यात आली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १ काेटी ११ लाखांच्या घरात असून, त्यापैकी जवळपास साडेअकरा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यंत्रणेला यश आले आहे. लसींचा तुटवडा पाहता, लस घेण्यासाठी जिल्ह्यातील २५८ लसीकरण केंद्रांवर वयोवृद्धांसह तरुणांची रोज एकच गर्दी होत आहे.
काही दिवसापूर्वी शुकशुकाट असलेल्या लसीकरण केंद्रांवर आता ज्येष्ठांबरोबर तरुणांच्याही रांगा दिसत आहेत. या रांगेचा फायदा सर्वांना मिळत असून, आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ जणांनी या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. १ मे नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाही लस दिली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आता १९ वर्षांच्या ६९ हजार २०७ तरुणांसह २९ वर्षांच्या १० लाख १६ हजार ८२४ अशा १० लाख ८६ हजार तरुणांच्या लसीकरणाची भर पडली आहे. याशिवाय ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ५० वर्षांच्या आतील म्हणजे ४९ वर्षांपर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांच्या लसीकरणाची जबाबदारी आता नव्याने वाढली आहे. या वाढीव लसीकरणास प्रारंभ झाल्यास आपणास लस घेण्यास विलंब होईल आणि नाहक कोरोनास बळी पडण्याच्या धास्तीतून २५८ केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसत आहेत.