ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. शहरात केवळ ४.४१ टक्क्यांच्या आसपास रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.३८ टक्के इतका आहे.शहरात दोन महिन्यांपूर्वी रोजच्या कोरोना चाचण्यांची संख्या पाच हजारांहून अधिक करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला दररोज ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून रोज १५० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत चार लाख ९६ हजार ७२९ चाचण्या करण्यात आल्या असून या सर्व चाचण्यांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. या चाचण्यांमध्ये आतापर्यंत ४६ हजार ८०२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४३ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. हे प्रमाण ९३.२१ टक्के इतके आहे. शहरात आतापर्यंत एक हजार ११५ रुग्ण मृत पावले आहेत. हे प्रमाण २.३८ टक्के इतके आहे. शहरात केवळ दोन हजार ६४ रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांंत उपचार सुरू आहेत. हे प्रमाण ४.४१ टक्के इतके आहे. काही महिन्यांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नव्हती. परंतु, आता रुग्णसंख्या घटल्याने शहरातील रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न असणार आहेत.
CoronaVirus News : ठाण्यात अवघ्या 4.41 टक्के कोरोना रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 7:08 AM