बदलापूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला बदलापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या आरोग्य पथकाने पहिल्या फेरीत आतापर्यंत ६८ टक्के घरांना भेटी दिल्या आहेत. आतापर्यंत तब्बल २ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ३०६५ व्यक्तींमध्ये लक्षणे आढळली आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाने ट्रॅक, ट्रेस व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर सुरू केला आहे.कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला सुरुवात झाली. नगर परिषदेची ११३ आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, नगर परिषदेचे शिक्षक, दुबे रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्सेस, एम. पी. डब्ल्यू. व डॉक्टर्स यांचा समावेश आहे. हे पथक रुग्णांना उपचार व आरोग्य शिक्षणही देत आहे. १५ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान एकूण १२२७ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. १५ सप्टेंबर रोजी मृत्युदर १.४१ टक्के होता तो ४ आॅक्टोबरपर्यंत १.२० टक्के एवढा झाला असल्याची माहिती नोडल आॅफिसर विलास जडये यांनी दिली.९५० नागरिकांची केली अँटिजेन टेस्टनगर परिषदेने दुबे रुग्णालयात २४ तास फिवर ओपीडी सुरू केली आहे. तसेच होम आयसोलेशन रुग्णांकरिता२४ तास डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले. सोनीवली क्वारंटाइन सेंटर, अँटिजेन टेस्ट, गौरी हॉल येथे कोविड रुग्णालय मोफत सुरू आहे.नगर परिषदेच्या कुळगाव शाळेतही २२ सप्टेंबरपासून मोफत अँटिजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ९५० नागरिकांची मोफत अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
CoronaVirus News: बदलापूरमध्ये मिळतोय सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:30 AM