स्नेहा पावसकर/अनिकेत घमंडी ठाणे/डोंबिवली : योगगुरु रामदेवबाबा यांच्या कंपनीने कोरोनावर रामबाण उपाय असल्याचा दावा करीत बाजारात आणलेले औषध ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांत अद्याप दाखल झालेले नाही. किमान १० दिवस ते येण्याची शक्यता नाही. मात्र, राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यग औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. सरकारने बंदी घातलेले हे औषध जिल्ह्यात विकले जाते किंवा कसे, याची खातरजमा करण्याकरिता दोन प्रतिनिधींनी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांना ‘ग्राहक’ म्हणून भेट दिली.कोरोनामुळे भयभीत झालेली सामान्य जनता दुकानात जाऊन औषध आले आहे का, याची चौकशी करीत आहे. कधीपर्यंत हे औषध उपलब्ध होईल? किती रुपयांत मिळेल? अशी चौकशी ग्राहक करीत आहेत. या औषधाच्या विक्रीवर सरकारने बंदी आणलेली असल्याकडे काही ग्राहकांचे लक्ष वेधले असता त्यापैकी काहींना बंदीची माहिती होती तर काहींच्या बंदी गावीच नव्हती. मात्र, सध्या तरी हे औषध ठाणे-मुंबईतील कोणत्याच दुकानात उपलब्ध नाही. ८-१० दिवसांत ते विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे, असे दुकानदारांनी सांगितले. औषध बाजारात आले आणि याचा खप वाढला तर इतरांचा बिझनेस होणार नाही. म्हणून बंदी आणली आहे, परंतु बाबा हे औषध विक्रीसाठी आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे ठाण्यातील एका विक्रेत्याने सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांमध्येही औषधाची प्रतीक्षा असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ते औषध यायला किमान १० दिवसांची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार असल्याचे दुकानदार सांगत आहेत. डोंबिवलीत केळकर पथ, मानपाडा रस्ता येथील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांमध्ये शुक्रवारपासून औषधाची मागणी केली जात आहे.या औषधाची विचारणा करणाऱ्या एका ग्राहकाला कोरोनावर अद्याप जगभरात औषध सापडले नसल्याचे माहीत आहे का, असे विचारले असता रामदेवबाबांच्या औषधाने कोरोना बरा झाला नाही, तर निदान तो होण्याची शक्यता कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.>राजकारण नको...राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाबाबत काही ग्राहकांनी व दुकानदारांनी नाराजी प्रकट केली. बाबांचे औषध किती प्रभावी आहे, यापेक्षा आम्ही ते रामदेवबाबांवरील श्रद्धेपोटी घेणार असल्याचे एका ग्राहकाने सांगितले. कोरोना व त्यावरील औषध यावरुन तरी राजकारण व्हायला नको, असे मत एका दुकानदाराने व्यक्त केले.
CoronaVirus News: रामदेवबाबांच्या कोरोनाप्रतिबंधक औषधांचा दुकानांमध्ये पत्ताच नाही, ग्राहकांचे खेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:18 AM