ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात लक्षणे असलेले रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना तत्काळ बरे करण्यासाठी सध्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर अधिक वाढला आहे. परंतु, मागील काही दिवसापासून ठाण्यात त्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब समोर आली. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांना देखील याचा साठा अपुरा पडू लागल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा धावत असून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कसरत करीत आहेत. ज्यांच्याकडे ते उपलब्ध होत आहे, त्याठिकाणी त्याची किंमत तिप्पट मोजावी लागत आहे.अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे महत्त्वाचे आधार ठरत आहे. विशेष म्हणजे लक्षणे असलेल्या रुग्णांवर आता लवकर उपचार मिळावेत आणि त्यांना लवकर घरी जाता यावे या उद्देशाने रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिक चढ्या किमतीला ते खरेदी करत आहेत.किंमत २५०० च्या घरात ८९९ रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन २१०० ते २५०० हजार रुपयांना मिळत आहे. ते बाहेरून मागवावे लागत असल्याचे मेडिकलचालक सांगत आहेत. पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातही दोन दिवस हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नसल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे येथील रुग्णांना ते बाहेरून मागवावे लागत आहे.
CoronaVirus News: ठाण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, नातेवाईक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:43 AM