लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढण्याचा वेग आता मंदावला आहे. मात्र, तरीही कंटेनमेंट झोनमधील निर्बंधावर कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाने ठाण्यातील पहाणी दौ-यामध्ये ठाणे महापालिका प्रशासनाला रविवारी दिले.केंद्रीय पथकाने कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात असलेल्या लोकमान्यनगर आणि मुंब्रा या भागाची ७ मे रोजी पहाणी केली. या पथकामध्ये स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी कुणाल कुमार तसेच दिल्लीतील दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. ६ जून अखेर ठाणे महापालिका क्षेत्रात तीन हजार ९१९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ११३ जणांचा मृत्यु झाला असून एक हजार ७५० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दोन हजार ५६ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. लोकमान्यनगर-सावरकरनगर या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे ९३६, वागळे इस्टेटमध्ये ६४१ तर मुंब्रा भागात ५३१ रुग्ण आढळले आहेत. लोकमान्यनगरमध्ये २० जणांचा मृत्यु झाला असून वागळे इस्टेट १७ तर मुंब्य्रात १४ जणांचा मृत्यु झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंंब्रा, कौसा येथील क्रीडा संकुलातील नविन कोविड रुग्णालय, लोकमान्यनगरमधील कंटेनमेंट झोन, महापालिका रुग्णालय आणि होरायझन रुगणालय आदीं भागांमध्ये केंद्रीय पथकाने पाहणी करुन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांची तसेच सर्व कोविड रुग्णालयांचा आढावा घेतला. यात रुग्ण दुप्पटीने वाढण्याचा वेग कसा आहे. रोज कोरोनाचे किती पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह रुग्ण होत आहेत. तसेच लॉकडाऊनचे नियम राज्य आणि केंद्र शासनाकडून ५ आणि ८ जूनपासून शिथिल करण्यात आले आहेत. अनेक दुकानांनाही सम विषम तारखांनुसार परवानगी दिली आहे. अत्यावश्यक कामांसाठी रिक्षा आणि कारमधूनही प्रवासाला परवानगी आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नियम शिथिल करण्यात येऊ नयेत. तिथे नागरिकांच्या वर्दळीवर, येण्या जाण्यावर, बाहेरील पाहुणे येण्यावर निर्बंध घातले जावेत. तर कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा वेग आणखी कमी होईल, असा आशावादही या केंद्रीय पथकाने व्यक्त केला आहे. सध्या ठाण्यात ३६८ कंटेनमेंट झोन असून त्यातील २८८ झोन हे कार्यरत (अॅक्टिव्ह) आहेत. त्याठिकाणी महापालिका प्रशासनानेही अॅक्शन प्लान तयार केला आहे. कोरोनाला या सर्वच झोनमधून हद्दपार करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये सर्व्हेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये २५ ते ३० पथकांचा चमू घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणीही करणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने या केंद्रीय पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या कामाबद्दल तसेच रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही सकारात्मकरित्या वाढ होत असल्याबद्दलही या पथकाने समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त पालिका आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपुल्ले आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राम केंद्रे आदी उपस्थित होते.*कौसा स्टेडियममधील त्रुटींवर वेधले लक्षकुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय तपासणी पथकाने ठाणे महापालिकेच्या त्रुटींवरही प्रशासनाचे लक्ष वेधले. कौसा स्टेडियमची पाहणी करताना काही कर्मचाऱ्यांनी मास्क तसेच पीपीइ किट्स घातले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्राच्या कोविड- १९ संदर्भातील सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, तिथे रॅपिड सर्व्हे करुन हायरिस्क मधील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही या पथकाने यावेळी दिल्या आहेत. शहरातील कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरची पाहणी केल्यानंतर या त्रिसदस्यीय पथकाने पालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. यामध्ये शहरात कोरोनाविषयक काय प्रतिबंधातात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचे सादरीकरण देखील यावेळी या केंद्रीय पथकाला दाखविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘केंद्रीय पथकाने रविवारी ठाण्यातील लोकमान्यनगर, मुंब्रा आदी ठिकाणच्या कंटेनमेंट झोनची तसेच कोविड रुग्णालयांची पाहणी केली. कंटेनमेंट भागात निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना या पथकाने केल्या आहेत.’’संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका