- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ७०० बेड असलेले कोविड रुग्णालय उभारले आहे. मात्र कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत असलेल्या संशयित रुग्णांसाठी एकही बेड उपलब्ध नाही, अशी सध्याची दुर्दशा आहे. अंबरनाथ शहरातील संशयित रुग्णांना कुठेच उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर मृत्यूशी सामना करण्याची वेळ येत आहे.शहरात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या आणि कोरोनाचा चाचणी अहवाल न आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. शहरांमध्ये अनेक रुग्ण कोरोनासदृश लक्षणांनी त्रस्त असतानाही त्यांना शहरातील कोणत्याच रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. छाया रुग्णालयातून संशयित रुग्णांना थेट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवित येते. मात्र त्याठिकाणी केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत.संशयित रुग्णांकरिता उल्हासनगरला आयसोलेशन वॉर्ड आहेत, असे सांगितले जात असले तरी तिथे जागा उपलब्ध होत नाही. छाया रूग्णालयात २० बेडचा आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची तयारी सुरू आहे.अंबरनाथ शहरात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
CoronaVirus News: संशयित रुग्णांना कुठेच थारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:42 AM