ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांतील ४५७ शिक्षकांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिले आहेत. मात्र आमच्या अन्य अडचणी लक्षात न घेता आमची नावे यासाठी घेतली गेली, असे सांगत काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.शहरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम शिक्षक करत आहेत. आता ठाणे पालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची मदतही घेण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी २६७ महिला आणि १९० पुरूष अशा ४५७ शिक्षकांची यादी तयार करून त्यांना नेमणूक केलेल्या प्रभागात हजर राहण्याचे आणि संबंधित मुख्याध्यापकांना या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत. यात माजिवडा-मानपाडा प्रभागात ५८, मुंब्रा प्रभागात ५६, लोकमान्यनगरमध्ये ५३, उथळसरमध्ये ५२, वागळे इस्टेट प्रभागात ४९, दिवा प्रभागात ४८ तर कळव्यात ४७ शिक्षकांची नेमणूक केली आहे. या शिक्षकांना निवासी लोकांची माहिती घेणे, कोरोना विषाणूची माहिती त्यांना देऊन जागृती करणे, सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेबाबत सूचना देणे अशा स्वरूपाची कामे करावी लागणार आहेत.नेमणूक केलेल्या या शिक्षकांपैकी काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या घरात मुले, वयोवृद्ध माणसे आहेत. त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. तसेच घरापासून सर्वेक्षणाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी वाहतूकीची योग्य सोय नाही, मात्र या समस्यांचा विचार न करता मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आमची नावे दिल्याचेही शिक्षकांनी म्हटले आहे.महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी कोविडच्या या कामात महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले. ज्या शिक्षकांना काही शारीरिक त्रास जाणवत असेल, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात तपासणी करून घ्यावी. फिट नसल्यास त्यांना यातून कार्यमुक्त केले जाईल, असेही सांगितले.
CoronaVirus News: सर्वेक्षणासाठी खाजगी अनुदानित शाळेच्या शिक्षकांची होणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:41 AM