लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाग्रस्त महिलेने मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेण्याचा बहाणा करीत मुंब्रा येथून थेट लखनौ येथील आपल्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, कौसा येथील ठाणे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने या महिलेला तिच्या तीन मुलांसह मुंबई विमानतळावरुन नुकतेच ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांनाही आता मुंब्रा येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे गंभीर अवस्थेतील कोरोनाचे रुग्ण गायब झाल्यानंतर ते थेट मृत पावल्याचे आणि त्यांच्यावर दुसºयानेच अंत्यसंस्कार केल्याच्या घटनांनी पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. असे असतांना काही काही जागृक अधिकाºयांमुळे परराज्यात पळून विमानाने पलायनाच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला तिच्या तीन मुलांसह पुन्हा ताब्यात घेण्यात ठामपाला यश आले आहे.मुंब्रा कौसा येथे एका रुग्णाचा गेल्या आठवडयात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, मुंबईच्या सेव्हन हिल्स रु ग्णालयात उपचार घेऊ, असे सांगून ही महिला मुलांसह मुंबईत गेली. तिकडे मात्र सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल न होता तिने लखनौ येथे आपल्या गावी जाण्यासाठी विमानतळ गाठले. दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्याऐवजी ती विमानतळावर पोहचल्याची माहिती तिच्या मोबाईलमधील आरोग्य सेतू अँपमुळे ठाणे आरोग्य विभागाला मिळाली. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने मुंबई पोलीसांच्या मदतीने तिच्यासह तिच्या तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंब्रा येथील क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात त्यांना कॉरंटाईन केले.मुंब्रा येथील रु ग्णालयात मुलांना आणि आपल्याला वेगवेगळे ठेवले जाईल, त्यामुळे मुलांपासून विलग व्हावे लागेल, या भीतीने आपण गावी नातेवाईकांकडे जाऊन उपचार घेणार होतो, अशी माहिती तिने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली.
‘‘ ही महिला कोरोनाग्रस्त असूनही ती उपचार घेण्याच्या नावाखाली मुंबईत गेली. मात्र उपचार रुग्णालयात दाखल होण्याऐवजी तिने विमानतळ गाठल्याचे समजल्यानंतर तातडीने हालचाली करुन मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला मुलांसह ताब्यात घेतले.’’डॉ. हेमांगी घोडे, आरोग्य अधिकारी, कौसा.‘‘ मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ही महिला उपचारासाठी जाणार होती. मात्र तिकडे न गेल्यामुळे मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन आता विलगीकरण केंद्रात ठेवले आहे.’’मधुकर कडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा------------------------