- पंकज पाटील
अंबरनाथ: कोविड रुग्णालयाला दोन दिवस देखील उरकत नाही तो त्या रुग्णालयातील रुग्णांची उपासमार सुरू झाली आहे. रविवारी रात्री जेवणासोबत आलेली भाजी खराब असल्याचं कारण पुढे करून निम्मे जेवण परत पाठविण्यात आले होते. मात्र हे जेवण बदलून न आल्याने काही रुग्णांना उपाशी झोपण्याची वेळ आली. तर सोमवारी देखील सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण हे उशिरा आल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. रुग्णालयातील रुग्णांना जेवणाची सोय ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र हे जेवण निकृष्ट दर्जाचे येत असल्याने या ठिकाणच्या रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री जेवण न आल्याने काही रुग्णांनी दहा वाजता त्यासंदर्भात विचारणा केली असता जेवणातील भाजीला वास येत असल्याने ते परत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र परत पाठवलेले जेवण बदलून येणे अपेक्षित असताना ते जेवण परत न आल्याने काही रुग्णांना उपाशीपोटी झोपावे लागले.
एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळचा नाश्ता नऊ वाजता येणे अपेक्षित असताना तो नाश्ता देखील वेळेत उपलब्ध झाला नाही, अशीच परिस्थिती दुपारच्या जेवणाची देखील झाली असून दुपारचे जेवण सायंकाळी चार वाजेपर्यंत आलेच नाही ही अशी तक्रार या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण चंद्रशेखर कोळी यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांना देण्यात येणारे जेवणाची परिस्थिती ती बिकट असल्याचे याआधी देखील स्पष्ट झाले होते.
निकृष्ट जेवण आणि त्याचा घसरलेला दर्जा यामुळे रुग्णांना पोषण मिळण्याऐवजी त्यांचे कुपोषण करण्याचे काम केले जात असल्याची तक्रार आता पुढे येत आहे. जेवण पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
'' ठेकेदाराला या आधी देखील ताकीद देण्यात आली होती. आत्ता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि रुग्णांना पुन्हा जेवणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. - जगतसिंग गिरासे. उप विभागीय अधिकारी.