ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने गुरुवारपासून पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार अंतर्गत रस्तेही बंद होते, केवळ मुख्यमार्ग सुरु होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, तर टीएमटी बसमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता. दुसरीकडे, सर्व बंद करण्याचा निर्णय असताना जांभळी नाका आणि इंदिरा नगर येथील मार्केट 1 वाजेपर्यंत सुरु होते. त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात याठिकाणी गर्दी दिसून येत होती. तर ठिकठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केले जात होते.
ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच मृतांची संख्या देखील 326 हून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी 2 ते 12 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील सर्वच आस्थापना बंद असतील असे सुरवातीला सांगितले गेले होते. परंतु बुधवारी सांयकाळी झालेल्या बैठकीनंतर जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठ सकाळी सुरु होती. तसेच इंदिरा नगर येथील मार्केटही सुरु ठेवण्यात आले होते.
भाजी मार्केट सकाळी 11 तर किराणा मालाची दुकाने दुपारी 1 वाजेर्पयत सुरु होती. त्यामुळे जांभळी मार्केटमध्ये नागरीकांनी पुन्हा गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे पोलिसांकडून वांरवार नागरीकांना लाऊडस्पीकरवरुन घरी जाण्याचे आवाहन केले जात होते. तसेच वेळ झाल्यानंतर दुकाने बंद करण्याच्या सुचनाही दिल्या जात होत्या. तर इंदिरा नगरच्या मार्केटमध्येही नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे या दोन मार्केटला एक न्याय आणि इतर दुकानदार आणि मार्केटला दुसरा न्याय का असा सवाल अनेक व्यापा-यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन सांगितले असतांना आम्ही त्याला सहकार्य केले आहे. परंतु प्रशासनाकूडनच जर अशा पध्दतीने अन्याय होत असेल तर कोरोनाला रोखण्यात प्रशासन कसे यशस्वी होईल असा सवाल काही व्यापारी आणि दुकानदारांनी उपस्थित केला आहे.दरम्यान दुसरीकडे शहरातील रस्त्यावरील वाहतुक रेंगाळली होती. अंतर्गत रस्ते बंद होते. शहरातील मुख्य चौकात वाहतुक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच आनंद नगर चेकनाका येथेही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यावश्कय सेवेतील नागरीकांनाच ये जा करण्याची मुबा दिली जात होती. तर शहरात ऑटो, टॅक्सी तसेच खाजगी वाहने देखील बंद होती.
महापालिकेच्या परिवहन सेवेच्या रोज 120 च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ 55 बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. त्या देखील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठीच चालविण्यात येत होत्या. इतर नागरीक बसमध्ये चढल्यास त्याला उतरविले जात होते. परंतु बेस्टच्या बसेसमध्ये सर्वाना प्रवेश दिला जात होता. एकूणच मार्केट परिसर वगळता इतर ठिकाणी कडकडीत बंद दिसून आला.