लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना मुंबई, ठाण्यातून परराज्यांत तसेच नेपाळकडे जाणा-या एका बसला ४४ प्रवाशांसह ठाणे प्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकाने रविवारी पडघा येथे पकडले. याशिवाय, गेल्या तीन दिवसांत आरटीओने ठाण्यातून परराज्यात जाणारी आणि येणारी अशी ३५ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहिर केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करुन परप्रांतीय प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे, सपना जमदाडे आणि विजय शिंदे आदींच्या पथकाने पडघा टोल नाका, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चेक पोस्ट आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दापचरी चेक पोस्ट आदी ठिकाणी १९ ते २१ जून या तीन दिवसांमध्ये ही कारवाई केली.१ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी परराज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ईपास काढणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे अत्यावश्यक करण्यात आले आहे. तरीही नियम धाब्यावर बसवत या प्रवाशांची वाहतूक परराज्यातून आलेल्या नऊ तर परराज्यात जाणाºया २६ अशा ३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. पडघा टोल नाका येथे २१ जून रोजी पकडलेल्या एका बसमध्ये तर चक्क २३ ऐवजी ४४ प्रवासी प्रवास करीत असल्याचे आढळले. यातील प्रवासी शहापूरमार्गे नेपाळकडे जात होते. ही बस आता जप्त करण्यात आली असून सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा तीन बस याच मार्गावर पकडण्यात आल्या. या बस चालकांकडे ईपास नव्हते. शिवाय, परमिट आणि इतर महत्वाची कागदपत्रेही नव्हती. अशाच प्रकारे गेल्या तीन दिवसांमध्ये दापचेरी चेक पोस्ट येथे १३, घोडबंदर नाका येथे ११ आणि पडघा टोल नाका येथे ११ अशा ३५ बसेस या मार्गावरुन जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पथकाने १९ जून रोजी १० बसेसवर, २० जून रोजी ११ आणि २१ जून रोजी १४ बसेसवर कारवाई केली. यातील सर्व प्रवाशांना ३० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाईक यांनी सांगितले.