लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु आहे. बऱ्याच भागातील रहिवाशी कॉरंटाईन तर काहींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याचाच गैरफायदा घेत चोरटयांनी मात्र दुकाने फोडण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गजबजलेल्या वस्तीमध्ये गुरुवारी रात्री मोबाईलच्या सुटया भागांच्या दुकानाचे छत फोडून सुमारे २५ ते ५० हजारांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे पश्चिम भागाकडील रेल्वे स्थानकाजवळ फलाट क्रमांक दोनच्या समोरच हे मोबाईलच्या सुटया भागांचे दुकान आहे. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन असल्यामुळे हे दुकान गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. याचाच फायदा घेत चोरटयांनी १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास या दुकानात चोरी केली. शुक्र वारी सकाळी दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या दुकानाच्या मालकाने ठाणेनगर पोलीस ठण्यात याबाबतची माहिती दिली. या दुकानाचे छप्पर तोडून आत शिरकाव करुन काही ब्ल्यू टूथ आणि मोबाईलचे काही सुटे भाग असा ऐवज चोरटयांनी लंपास केला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी बाजारपेठांमध्ये रात्री तसेच पहाटेच्या सुमारास गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.